Breaking News
Paris Olympic- वीनेश फोगट स्पर्धेतून बाद ,भारताचे अपील
ट्रेण्डिंग
पॅरिस - पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून भारतासाठी एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी विनेश फोगटची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे.
“विनेशची अपात्रता अत्यंत धक्कादायक आहे. मी तिला ऑलिम्पिक व्हिलेज क्लिनिकमध्ये भेटले आणि तिला भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA), भारत सरकार आणि संपूर्ण देशाकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विनेशला सर्व प्रकारचे वैद्यकीय आणि भावनिक समर्थन देत आहोत”, असं पी. टी. उषा म्हणाल्या.
“भारतीय कुस्ती महासंघाने विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी UWW ला अर्ज केला आहे. IOA शक्य तितक्या पद्धतीने याचा पाठवपुरावा करणार आहे. डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्या नेतृत्त्वाखालील वैद्यकीय पथक आणि शेफ-डी-मिशन गगन नारंग यांच्याकडून तिच्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं”, असं या निवेदनात म्हटलं आहे.
भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.
विनेशने मंगळवारच्या लढतीसाठी वजन केले होते. नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या कुस्तीपटूचे वजन मंगळवारी रात्री अंदाजे २ किलो वजन जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade