Breaking News
मनूची हॅटट्रिक थोडक्यात हुकली, भारतासाठी आजचा दिवस निराशेचा
पॅरिस -:पॅरिस ऑलिम्पिकच्या 8व्या दिवशी भारताला तिरंदाजी आणि नेमबाजीत 2 पदकांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. महिला नेमबाजीत शनिवारी महिलांच्या 25 मीटर पिस्तुलची अंतिम फेरी पार पडली.भारतीय नेमबाज मनू भाकरचे तिसरे पदक हुकले. अंतिम फेरीत ती चौथ्या स्थानावर राहिली. कांस्यपदक जिंकणाऱ्या हंगेरीच्या मेजर वेरोनिकाकडून मनूला शूटऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. 22 वर्षीय मनूने या ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्यपदके जिंकली आहेत.
तिरंदाजीमध्ये वैयक्तिक प्रकारात दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. तिला कोरियाच्या नाम सू येऑनने 6-4 ने पराभूत केले.बॉक्सर निशांत देव 71KG गटातील उपांत्यपूर्व सामना दुपारी 12:14 वाजता खेळेल. त्याचा सामना मेक्सिकोच्या मार्को अलोन्सो वर्दे अल्वारेझशी होणार आहे. निशांतने हा सामना जिंकल्यास भारताचे कांस्यपदक निश्चित होईल.
या अंतिम फेरीनंतर मनू भाकेरने जिओ सिनेमासह संवाद साधला, तेव्हा थोडी निराश आणि भावूक झालेली पाहायला मिळाली.महिलांच्या २५ मीटर नेमबाजी स्पर्धेत पदक गमावल्यानंतर मनूने मुलाखत दिली. जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीला उत्तर देताना ती भावूक झाली. मनूला अगदी एका अंकासाठी मागे राहिल्याने पदकापासून लांब राहावे लागले. त्यामुळे बोलताना मनूला भरून येत होतं, असं तिच्या आवाजावरून वाटलं. मात्र, मनूने कॅमेऱ्यात अश्रू ढळू दिले नाहीत आणि मुलाखत पूर्ण केली. ती म्हणाले की, चौथ्या स्थानी मी राहिली जी फार चांगलं नाही.
मनू भाकेर म्हणाली, “फायनलमध्ये मी दडपणाखाली होती. मी शूटऑफच्या वेळेस खूप दडपणाखाली होती. मी शांत राहण्याचा खूप प्रयत्न केला. माझं सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुरेस नव्हतं. “मला दोन पदके मिळाली याचा मला आनंद आहे, पण आत्ता… चौथ्या स्थानी येऊन फारसं चांगलं वाटत नाहीय.
मनू भाकेरने आतापासूनच २०२८ च्या लॉस एंजेलेस ऑलिम्पिकचा मनात विचार सुरू केला, म्हणाली, “माझा सामना संपल्यावर मी स्वतला सांगितलं ठीके काही हरकत नाही, पुढच्या वेळेस पूर्ण करू. मी तुम्हाला समोर दिसते पण पडद्यामागे खूप जणांची मेहनत आहे. माझ्यासोबत अनेकांनी मेहनत घेतली आहे. खूप छान प्रवास होता. OGQ, SAI, PM मोदी जी, जसपाल सर, मित्रमंडळी, कुटुंबीयांचे आभार… मी कृतज्ञ आहे, मी तुम्हा सर्वांचे आभार मानते, खूप सारं प्रेम. पुढच्या वेळी कदाचित आम्ही अधिक चांगली कामगिरी करू. आईसाठी एक मेसेज म्हणजे तू केलेल्या सर्व त्यागांसाठी धन्यवाद.” मनू भाकेर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत दोन ऑलिम्पिक कांस्य पदकांसह मायदेशी परतणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर