Breaking News
पावसाळ्यातील दयनीय परिस्थिती
कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरीत तर २५० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. हे सुरू असतानाच मुंबईमध्ये नालेसफाईवरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत असल्याचे दिसतात. मुंबईत जरा पाऊस पडला की, मुंबईची तुंबई होते, याकडे मुंबई महापालिकेने गामभिर्याने लक्ष देण्याची गरज वाटते. पावसाळा आला की भांडायचे आणि पुन्हा वर्षभर निगरगट्ट राहायचे ही वृत्ती राजकारणी नेते सोडतील का ?
कोकणात अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आल्या आहेत. रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पावसाचा जोर वाढला तर समुद्र आणखी खवळेल असा अंदाजही हवानाम खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दरवेळी पावसाळ्यात सर्वत्र पाणी तुंबते. यावर कोण उपाययोजना करीत नाहीत. तसेच पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडून अनेक अपघात होतात. त्यासाठी ठेकेदारांकडून योग्य ते काम करून घेतले पाहिजे. रस्त्याच्या कडेला जी गटारे आहेत, त्यांची स्वच्छता उन्हाळ्यात केली पाहिजे, असे वाटते. याकडे राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थानी लक्ष दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो. पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात, असे दिसून येते. या दुर्घटना रोखण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले पाहिजे.
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग ५० - ६० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.५० - ६० किमी प्रति तासाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मुंबईत तर पावसाळ्यात दरवर्षी तीच परिस्थिती दिसून येते. २००५ साली पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली गेली होती. त्यावेळी अनेक जणांचे मृत्यू झाले. काही जण संसर्गाने नंतर मृत्युमुखी पडले. हा इतिहास ध्यानात घेऊन महापालिका गटारांची सफाई उन्हाळ्यात करीत नाहीत. तसेच प्लास्टिक कचरा मानवी आयुष्याला घातक असताना गटारांत प्लास्टिक कचरा जास्त दिसतो. परिणामी पावसाळ्यात महानगरांमध्ये पाणी तुंबून पुरसदृश्य परिस्थिती तयार होते. मानवाचे जीवन धोकादायक झाले आहे हे खरे वास्तव आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच रायगड जिल्ह्याला नुकताच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोणतीही जीवितहानी घडू नये म्हणून प्रशासन सज्ज असल्याचे म्हटले जात आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या किल्ले रायगडवाडी येथील युवक किल्ले रायगडाच्या शेजारी असणाऱ्या धबधब्यावरून वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. त्यांनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रशासनानकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांना धबधबे, तलाव, समुद्राकडे जाण्यास पावसाळतात मनाई केली पाहिजे,असे वाटते. याबाबत फक्त परिपत्रक काढून उपयोग नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करणे गरजेचे आहे. लोणावळा येथील भुशी धरणाच्या परिसरात एक कुटुंब पाण्यात वाहून गेले, ही घटना ताजी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी सुरू असून ओरोस, जिजामाता नगर येथील शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. जिजामाता नगर येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे व भाजप नेते निलेश राणे यांनी पाहणी केली. सर्व नागरिकांची हायस्कूल व हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या नागरिकांची राणे यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. राजापूर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या मिळंद आणि जवळेथर या रस्त्याच्या दरम्यान दरड रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे इथल्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे. पावसाळ्यात मुंबई व उपनगरामध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पावसाळा दरवर्षी असाच जातो, पावसाळ्यात माकडाचे घर बांधून होत नाही, या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant