Breaking News
क्रीडा संघटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदाचा आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्कार-२०२१ शिवाजी पार्कमधील शानदार सोहळ्यात प्रदान केला. याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक व क्रिकेटपटू डॉ. संजय सुरासे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांना रुपये एकवीस हजारसह गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा पुरस्कार देण्यात आला.
माजी क्रीडापटू व संघटक ७१ वर्षीय गोविंदराव मोहिते यांचा आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व शिवनेरतर्फे शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच शिवाजी पार्क मैदानात पार पडले. मुंबईतील नामवंत रुग्णालयीन १४ संघांची टी-२० क्रिकेट स्पर्धा ग्लोबल हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आदी संघांनी गाजविली. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांनी गोविंदराव मोहिते यांच्या पाच दशकांच्या क्रीडा कारकिर्दीला उजाळा देत अभिनंदनाचा वर्षाव केला. गौरवमूर्ती गोविंदराव मोहिते यांनी पुरस्काराची रक्कम क्रीडा कार्यासाठी संयोजकांकडे सुपूर्द केली.
कामगार विभागामधील नावाजलेले कबड्डीपटू, व्यायामपटू व क्रीडा संघटक म्हणून गोविंदराव मोहिते यांचा लौकिक आहे. बैठका मारण्याचा त्यांचा विक्रम लालबागकरांच्या आजही स्मरणात आहे.
प्रतिवर्षी विविध संस्थांमार्फत होणाऱ्या कबड्डी, बुध्दिबळ, क्रिकेट, कॅरम, कुस्ती, व्यायाम आदी स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो. सन २०१५ मध्ये अमेरिकेत मुंबईच्या गोविंदाचे प्रात्यक्षिक दाखविणाऱ्या पथकाची माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पेलली. पहिल्या मुंबई शेरीफ आंतरराष्ट्रीय गुणांकित फिडे बुध्दिबळ स्पर्धेत त्यांचा सुवर्ण पुरस्कार देऊन झालेला गौरव तसेच महात्मा गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्ती चळवळीच्या दरबारातील सन्मान, गोविंदरावांच्या क्रीडा-सामाजिक कार्याची पोचपावती देणारा ठरला. कबड्डी, कॅरम, बुध्दिबळ व क्रिकेट खेळाच्या मोफत स्पर्धा व प्रशिक्षण संदर्भात शालेय चळवळीमध्ये त्यांचा अनेक वर्षे सहभाग आहे. राज्यातील विविध कामगार, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा संस्थाच्या कार्यात रमणारे गोविंदराव मोहिते यांच्या सेवाभावी अष्टपैलू कार्याची दखल घेत आयडियल जीवन गौरव क्रीडा पुरस्काराने झालेल्या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant