Breaking News
नवी मुंबई : संपुर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून देशात लॉकडाऊन सुरु आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असूनही घणसोली गावात एकाच रात्रीत सात ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.बंद दुकानांचे शटर तोडून त्याठिकाणी चोर्या झाल्या आहेत. यामुळे लॉकडाऊन चोरांच्या पथ्यावर पडले असून परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेक दुकाने बंद आहेत. तर नागरिकांनाही संचारबंदी असल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर दिवसादेखील शुकशुकाट पहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा घेत चोरटयांनी घणसोली गाव परिसरातील सात दुकाने फोडली आहेत. त्यामध्ये औषधांच्या दुकानांसह किराणा मालाची दुकाने व इतर दुकानांचा समावेश आहे. त्यापैकी एका ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये चोरीचा प्रकार कैद झाला आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती चोरी करताना दिसत आहेत. त्यांनीच सर्व गुन्हे केल्याची शक्यता असून हे सर्व गुन्हे रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडले आहेत. दोघेजण औषधाच्या दुकानात चोरी करत असताना त्याच ठिकाणावरून एक दुधाची गाडी देखील गेली. परंतु अर्धवट तोडलेले शटर तसेच सोडून चोरटयांनी तात्काळ तिथल्याच एका रिक्षाचा आडोसा घेतला. त्यांनतर पुन्हा त्यांनी दुकानात घुसून चोरी केली. त्यामध्ये एकूण किती ऐवज चोरीला गेला याचा उलगडा पोलिसांकडून होऊ शकलेला नाही. तर घडलेल्या या गुन्ह्या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya