Breaking News
नवी मुंबई ः खालापूर तालुक्यातील चांभार्ली गावातील एका या अनाथाश्रमातील आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार करणार्या तिघांना पनवेल येथील सत्र न्यायालयातील न्या. माधुरी आनंद यांनी अनुक्रमे 14, 10 व एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना एप्रिल 2015मध्ये घडली होती.
खालापूर येथील मौजे चांभार्ली गावच्या हद्दीत अनाथ मुला-मुलींसाठी अनाथालय सुरू होते. हे अनाथालय सुपन राजेंद्रन हे पत्नी व दोन मुलांसह चालवत होते. या आश्रमात अनाथ तसेच गोरगरीब मुले-मुली वास्तव्यास होते. चालक सुपन राजेंद्रन यांचा मुलगा ख्रिस्टियन राजेंद्रन (24) व दुसरा मुलगा जॉय राजेंद्रन (19) दोघांनी ऑर्फनेजमध्ये राहणार्या आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार आरोपींची आई सलोमी राजेंद्रन यांना समजल्यानंतर त्यांनीही ही बाब लपवून ठेवली. लैंगिक छळ असह्य झाल्याने येथील एका पीडित मुलीने त्यांच्यावरील लैंगिक छळाची माहिती वर्गशिक्षिकेला दिली. त्यामुळे या वर्गशिक्षिकेने या प्रकाराची माहिती बाल कल्याण समितीला दिली. त्यानंतर बालकल्याण समितीच्या सदस्यांनी एप्रिल-2015मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तिथे असलेल्या पीडित मुलांची सुटका करुन त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रसायनी पोलिसांनी पीडित मुलींच्या वतीने ख्रिस्टियन आणि जॉय या दोघा भावांविरोधात बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, विनयभंग, मारहाण करणे त्याचप्रमाणे पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रसायनी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण 21 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्या. माधुरी आनंद यांनी सोमवारी खालापूर येथील ख्रिस्टियन राजेंद्रन यास 14 वर्षे सश्रम कारावास व 85 हजार दंड तसेच जॉय राजेंद्रन याला 10 वर्षे सश्रम कारावास आणि 35 हजार रुपये दंड तर या गुन्हयाची माहिती असतानाही ही माहिती पोलीसांना न कळविणार्या सलोमी राजेंद्रन या आरोपींच्या आईस एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपींकडून मिळणारी दंडाची सर्व रक्कम पीडित मुलींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya