Breaking News
दिड लाखांचे 9 लॅपटॉप जप्त
नवी मुंबई : वाशी येथील श्रीमंत परिसर समजल्या जाणार्या से.17 मध्ये रस्त्यांवर उभ्या असलेल्या कारची काच फोडून सराईतपणे लॅपटॉप लंपास करणार्या एका चोरास वाशी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमतीचे 9 लॅपटॉप जप्त केले. परि-1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.
नवी मुंबईतील सर्व प्रथम विकसीत झालेला वाशीतील सेक्टर 17 हा परिसर व्यवसायासाठी व उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो. ह्या परिसरात येणार्या व पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार हेरून आवाज न करता काच तोडून आतील सीटवरचा लॅपटॉप पळविण्याचा उद्योग करणार्या रविंद्रकुमार संतलाल गौंड (37) रा. मानखुर्द याला वाशी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अटक केली. यासाठी पोलिसांना गुप्त बातमीदार व तांत्रिक मुद्द्यांचा तपास कामी आला. आरोपी काही वर्षांपूर्वी से. 17 मधील टाटा डोकोमो दुकानात काम करीत होता. 2015 मध्ये त्याच्यावर ह्याच प्रकारचा गुन्हा वाशी पोलीसांत दाखल झाला होता. 20 फेब्रुवारीला आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत. एसीपी विनायक वत्स, वाशी वपोनि. संजीव धुमाळ, पोनि. रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. काशिनाथ माने, पोना. हिंदुराव कदम, सुनील चिकणे, निलेश किंद्रे, पोशि. अविनाश मोकळे, उत्तरेश्वर जाधव या टीमने ही यशस्वी कामगिरी पार पाडली. नागरिकांनी आपल्या वाहनांमध्ये कोणतेही मौल्यवान वस्तू, रोख रक्कम इत्यादी ठेवून कामासाठी जाऊ नये, असे आवाहन उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya