Breaking News
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत होणार पारंपरिक देशी खेळ महोत्सव
मुंबई - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभाला बुधवारी कुर्ला येथे जल्लोषात सुरुवात होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मैदान केवळ देशी आणि पारंपरिक खेळांसाठी राखीव करण्यात आले आहे. या मैदानाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान असे नामकरण आणि लोकार्पण ही याच सोहळ्यात केले जाणार आहे.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. माणिकरावजी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा महाकुंभचे उदघाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण होणार आहे. तर व्हिडीओ संदेशाद्वारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस क्रीडा महाकुंभात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करणार आहेत. तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे पुत्र श्री. रणजित जाधव यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली असून येत्या १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संस्कृती रक्षणासाठी केलेले योगदान आपला देश विसरू शकत नाही. अहिल्यादेवींनी दिलेला सांस्कृतिक वारसा जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी मातीतले आपले पारंपरिक खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवा ही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. नव्या पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देण्याची वेळ आली असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांब या सारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार असल्याचेही मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. या क्रीडा महाकुंभात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा ठेवा अबाधित ठेवावा, असे आवाहनही मंत्री श्री लोढा यांनी जनतेला उद्देशून केले आहे.
क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे. शाळा,आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता आता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar