Breaking News
सर्पमित्रांना नवी ओळख, फ्रंटलाईन वर्करचा दर्जा, 10 लाख रुपयांचा विमा; मुख्यमंत्र्यांकडे मंत्री महोदयांची शिफारस
मुंबई : ऐ आपल्या गल्लीतल्या काळ्यांच्या घरी साप (Snake) निघालाय, एखाद्या सर्पमित्राचा नंबर असेल तर बघ बरं. अनेकदा गावखेड्यात, आता शहरी भागातील नागरी वस्तीतही साप निघाला की एखाद्या सर्पमित्राची आठवण होते. मग, सर्पमित्र देखील काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचतात, त्यानंतर विषारी असो की बिनविषारी त्या सापाला पकडून ते अज्ञातवासात, निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात. त्यामुळे, सापाच्या भीतीने या वन्यजीवास ठार मारणाऱ्यांपासून त्याची सुटका होते आणि सर्पमित्रांनाही वन्यजीव वाचविल्याचा आनंद होतो. अनेकदा या सर्पमित्रांना जीवावर उदार होऊन ही कामगिरी पार पाडावी लागते, तर काहीवेळा सर्पदंशाने जीवही गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता, याच सर्पमित्रांना शासनाकडून 10 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे. सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देत हा लाभ देण्यात येणार आहे.
आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता 'फ्रंटलाइन वर्कर' होणार आहे. शासनाकडून सर्पमित्रांना 'फ्रंटलाइन वर्कर'चा दर्जा देण्याची तयारी असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तशी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे शासनाच्यावतीने या सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र ही दिले जाणार आहे. ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. त्यांना 'अत्यावश्यक सेवा' आणि 'फ्रंटलाइन वर्कर' म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सर्पमित्रांची संख्या वाढली
एखाद्या सोसायटीच्या आवारात साप आढळला की अस्वस्थ आणि भीतीने गांगरलेले रहिवाशी आपआपला मोबाइल धुंडाळतात.मोबाइलच्या पडद्यावर येणारे काही नंबर्स दाबतात आणि पुढील अवघ्या काही मिनिटांत चार ते पाच सर्पमित्र एकाचवेळी हजर होतात. हा अनुभव शहरातील अनेकांना अनेकवेळा येतो. अलिकडच्या काळात सर्पमित्रांची वानवा जाणवत असताना अचानक सध्या त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्ष साप पकडल्यानंतर त्या कामाची थेट बातमी सोशल नेटवर्कींगसाइट्सवर झळकते. सर्पमित्रांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असली तरी त्यामध्ये प्रशिक्षित सर्पमित्रांची संख्या अधिक दिसत नाही. त्यामुळे, काहीवेळा सर्पमित्रांना साप पकडताना गंभीर दुखापतही झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
गारुडी, नागवाला बाबा काळाच्या पडद्याआड
केवळ धोका पत्करून साप पकडण्याचे काम पूर्णत्वास येत नाही. त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि वारंवार केला जाणारा सराव यांची गरज असते. या छंदाकडे केवळ प्रसिद्धी मिळण्याचे माध्यम म्हणून पाहिले जात असल्याचे लक्षात येते. सोशल नेटवर्किंग साईटसवर हाती साप घेऊन काढलेले फोटो पाहिले की अनेकांना या व्यवसायाबाबत प्रश्न पडतो, हे स्वाभाविक आहे. सर्पमित्र ही शहरांची गरज आहे आणि त्यासाठी अनेकांचे प्रमाणिक प्रयत्न सुरू आहेत. कधीकाळची गारुडी, नागवाला बाबा ही संकल्पना लोप पावत असताना केवळ सर्पमित्रांचा आधार उरला आहे. त्यामुळे या क्षेत्राला अधिक महत्व आले असून आता शासनानेही त्यांच्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar