Breaking News
अंबरनाथ हादरलं ! शिवसेना शाखेजवळ भरचौकात तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या
Thane Crime: मुंबईपासून जवळच असलेल्या अंबरनाथ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी नगर भागातील शिवसेना शाखेजवळ असलेल्या एका वर्दळीच्या चौकात सोमवारी (7 जुलै) रात्री एका 34 वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही घटना घडली त्या ठिकाणापासून शिवाजीनगर पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा बॅनरने झाकलेला, तपासात अडथळा
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, घटनास्थळाजवळील एक सीसीटीव्ही कॅमेरा राजकीय पक्षाच्या बॅनरने झाकला गेला होता. यामुळे आरोपींचा शोध घेण्यास आणि घटनेच्या वेळची नेमकी परिस्थिती समजून घेण्यास पोलिसांना अडचण येत आहे.
नेमकं काय घडलं?
शिवाजी नगर हा अंबरनाथ शहरातील सर्वात जुना आणि वर्दळीचा भाग आहे. अंबरनाथ स्थानक, आनंद नगर औद्योगिक वसाहत आणि काटई राज्यमार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने या भागात नेहमीच वाहनांची आणि माणसांची मोठी गर्दी असते.
सोमवारी रात्री साधारण साडेबाराच्या सुमारास एका चहा विक्रेत्याच्या दुकानासमोर एक व्यक्ती रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अनेकांना सुरुवातीला तो मद्यधुंद अवस्थेत असावा,असं वाटलं, त्यामुळे काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, बराच वेळ काहीच हालचाल न दिसल्याने काही जागरूक नागरिकांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली.
मृताची ओळख पटली..
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्या व्यक्तीचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्यावरही गंभीर जखमा आढळल्या. मृताची ओळख पटली असून, त्याचे नाव निजामुद्दीन अन्सारी (वय-34) असे आहे. तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. अंबरनाथमध्ये बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करत होता.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले आहेत. पोलिस लवकरच मारेकऱ्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करतील, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar