Breaking News
पुरवणी मागण्यांमध्ये चोंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उप मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. पुरवणी मागण्यांमध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्म त्रिशताब्दी निमित्त चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे आयोजित मंत्रीमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या चोंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी देखील 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चोंडी येथे मंत्रीमंडळाची बैठक व्हावी यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.
दिनांक 6 मे 2025 रोजी झालेल्या चोंडी येथील मंत्रीमंडळ बैठकीत 681 कोटींचा चोंडी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यापैकी 154 कोटी निधीच्या कामांना स्थापत्य सल्लागार नेमणूक प्रक्रियेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे.
आज सभागृहात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये:
1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी मर्यादित चोंडी, ता. जामखेड, जि.अहिल्यानगर यास शासकीय भागभांडवल म्हणून 13 कोटी 20 लाख 25 हजार रु. चा समावेश आहे.
2) याच सूतगिरणीला दीर्घ मुदतीचे शासकीय कर्ज म्हणून 17 कोटी 70 लाख इतक्या निधीची तरतूद पुरवणी मागणी करण्यात आली आहे.
3) कर्जत-कोरेगाव- चापडगाव- चोंडी- हळगाव- फक्राबाद-कुसडगाव रा/मा 548 ड रस्ता रा/मा 405 किमी ०/०० ते ४३/०० मध्ये रुंदीकरण व सुधारणा करणे या कामांसाठीचा अंदाजित खर्च 200 कोटीं रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी सन 2025-2026 करीता 61 कोटी 38 लाख 11 हजार रुपये या पुरवणी मागण्यांमध्ये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
4) कर्जत जि.अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायाधीश यांच्या निवास्थानाकरिता रुपये 1 कोटी 28 लाख 30 हजार पैकी या पुरवणी मागणीत 25 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या पुरवणी मागण्यांमध्ये चोंडी विकासाच्या दृष्टीने भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर