Breaking News
हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट जाहीर
Maharashtra Weather Alert: मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांत आकाश ढगांनी आच्छादलेले आहे, तर काही ठिकाणी उजळ सूर्यप्रकाश दिसत आहे. मधूनमधून काळसर ढगांचा समूह एकवटत असून, त्यामुळं एखादी दमदार पावसाची सर कोसळून जाते. राज्यातील इतर अनेक भागांतही असेच दृश्य पाहायला मिळत असले तरी, घाटमाथ्याच्या परिसरात मात्र पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक निरीक्षणांवर आधारित अंदाजानुसार, कोकण आणि घाटमाथ्याच्या पट्ट्यात सध्या सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असून, हा पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे आणि इतर घाट परिसरातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांतही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, त्या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवसांत धुवांधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनने वेगाने आपली वाटचाल सुरू ठेवली असून, रविवारी संपूर्ण भारतात त्याचा प्रवेश झाला. दरम्यान, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने आगामी पाच दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा मारा होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मान्सूनची देशभरात जोरदार सक्रियता
यंदा मान्सूनने ठरलेल्या वेळेपूर्वीच देशात आगमन केले आणि काहीच दिवसांत संपूर्ण भारत व्यापला. सामान्यतः ८ जुलैपर्यंत मान्सून देशभर पसरतो, मात्र यंदा त्याने अपेक्षेपेक्षा लवकरच आपला विस्तार केला. यामुळे देशभरात जोरदार पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः उत्तर भारतात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे