Breaking News
संसद व विधी मंडळ सदस्यांच्या शाही मेजवानीवरुन वाद
नवी दिल्ली - शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना देण्यासाठी २१०० रुपये पैसे नाहीत, अशी ओरड महायुती सरकारकडून सुरू आहे. मात्र दुसरीकडे संसद व विधी मंडळ सदस्यांना जेवणासाठी चांदीचे ताट तेही ५५० रुपये भाड्याने, जेवणाच्या एका ताटाची किंमत ४,५०० रुपये खर्च झाल्याने संसद व विधी मंडळ सदस्यांचा हा शाही पाहुणचार आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात चांदीचे ताट, शाही पाहुणचार यावर विरोधक महायुती सरकारला जाब विचारणार असल्याचे मविआच्या नेत्यांनी सांगितले.
संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील सदस्यांनी ४५०० रुपयांचे शाही भोजन तेही ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात असा पाहुणचार घेतला. एका ताटासाठी ४,५०० रुपये खर्च हा पैसा धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवानी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. शासनाच्या अनेक योजना ठप्प आहेत. पण या सगळ्या संकटात सत्ताधाऱ्यांनी चांदीच्या ताटात पाच हजार रुपयांच्या थाळीचा ‘शाही ‘ अनुभव घेतला. या आर्थिक कंगालीतसुद्धा सरकारला फक्त दिखावा करायचा आहे. गरिबांच्या वाट्याचे अन्न बाजूला ठेऊन, स्वतः मात्र शाही थाटात जगायचे आहे. हे गरीब आणि सामान्य जनतेच्या जखमांवर तिखट मीठ चोळणे आहे, अशी टीका विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
असा केला शाही पाहुणचारावर खर्च
-चांदीच्या भाड्याच्या ताटासाठी ५५० रुपये
-एका जेवणाच्या ताटासाठी ४,५०० रुपये
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर