Breaking News
अॅक्सिओम-4 मिशन लाँच ; ! तब्बल 41 वर्षांनंतर अंतराळात झेपावला भारतीय अंतराळवीर
Axiom-4 Mission Launched: अॅक्सिओम-4 मिशन वारंवार पुढे ढकलेण्यात आलेल्यानंतर अखेर बुधवारी 25 जूर 2025 रोजी आकाशात झेपावले आहे. अॅक्सिओम-4 च्या ( Axiom-4 mission) अंतराळातील ऐतिहासिक प्रवासाला आज सुरुवात झाली. नासा, स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेसचे हे संयुक्त मिशन दुपारी 12:01 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) रवाना झाले. हे मिशन भारतासाठी देखील खूप खास आहे. कारण आयएसएसमध्ये जाणाऱ्या चार अंतराळवीरांमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचाही समावेश आहे. ते या मोहिमेत अंतराळयान पायलटच्या भूमिकेत आहे.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Who Is Shubhanshu Shukla) आज 25 जून रोजी अॅक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहेत. शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहेत. सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान 26 जून रोजी दुपारी 04:30 वाजता सुमारे 28.5 तासांनंतर आयएसएसशी जोडले जाईल.
41 वर्षांनंतर अंतराळात झेपावला भारतीय अंतराळवीर
भारतासाठी 25 जून 2025 हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अमेरिकन व्यावसायिक अंतराळ कंपनी अॅक्सिओमने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अॅक्सिओम-4 मिशन लाँच केले आहे. भारताचे शुभांशू शुक्ला या मोहिमेचा भाग आहेत. 41 वर्षांनंतर एका भारतीय अंतराळवीराने आकाात झेप घेतली आहे. यापूर्वी 1984 मध्ये राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. याआधी 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता.
कोण आहेत शुभांशू शुक्ला?
शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो यांच्यातील करारानुसार त्यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली. शुभांशू यांचा जन्म 1986 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झाला. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून (एनडीए) शिक्षण घेतले. यानंतर ते 2006 मध्ये हवाई दलात सामील झाले. त्यांना लढाऊ विमाने उडवण्याचा मोठा अनुभव आहे.
इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीही निवड
शुभांशू शुक्ला यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी देखील निवड करण्यात आली आहे. ही मोहिम भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे. त्यामुळे अॅक्सिओम-4 मिशनमधील त्यांचा अनुभव इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. अंतराळवीर होण्यासाठी शुभाशू यांनी रशिया आणि अमेरिकेत विशेष प्रशिक्षण घेतले. यामध्ये त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, आपत्कालीन हाताळणी आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये काम करण्याचे कौशल्य आत्मसात केले.
नेमकं काय आहे अॅक्सिओम मिशन?
अॅक्सिओम-4 मिशन ही अॅक्सिओम कंपनीची चौथी मानवयुक्त मोहीम आहे. नासा आणि स्पेसएक्सच्या मदतीने ही मोहीम पार पाडली जात आहे. या अंतर्गत अॅक्सिओमने एका खाजगी व्यावसायिक अंतराळयानात चार अंतराळवीरांना आयएसएसमध्ये पाठवले आहे. हे अंतराळवीर त्यांच्या उद्दिष्टांनुसार अंतराष्ट्रीय स्पेस स्थानकावर 60 हून अधिक प्रयोग करतील. या प्रयोगांच्या माध्यमातून अंतराळातील वातावरणाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, अवकाशात केली जाणारी शेती आणि पदार्थांशी संबंधीत मटेरिअल सायन्स समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अॅक्सिओम-4 मिशनमध्ये अमेरिका आणि भारतासोबतच पोलंड आणि हंगेरीमधील अंतराळवीरांचा देखील समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar