Breaking News
खास तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालय... सीएसएमटी स्थानकात दिव्यांगांसाठी नव्या सुविधा
CSMT Station Special Facilities For Disabled: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानक आता दिव्यांगांसाठी अतिशय खास बनलं आहे. सीएसएमटी हे 'दिव्यांग फ्रेंडली' स्थानक म्हणून विकसित केले जात आहे. येथे दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन खास शौचालये, तिकीट काउंटर आणि इतर सुविधा वाढवल्या जात आहेत.
दिव्यांगांच्या वाहनांसाठी खास पार्किंग
सीएसएमटी स्थानकात दिव्यांगांच्या वाहनांसाठी खास पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही जागा ओळखण्यासाठी आकाशी रंगात मार्किंग करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांगांना आपले वाहन पार्किंग करणे सोपे होणार आहे.
कमी उंचीचे काउंटर
दिव्यांगांना तिकीट खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी सीएसएमटी येथे कमी उंचीचे अतिरिक्त बुकिंग काउंटर तयार केले जात आहेत. या काउंटरपर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी स्पर्शमार्ग (टॅक्टाइल पाथ) बनवले जात आहेत.
ब्रेल लिपीतील दिशादर्शक फलक
सीएसएमटी स्थानकात ब्रेल लिपीतील दिशादर्शक फलक बसवण्यात येत असून अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या स्थानकांचा विकास करताना दिव्यांगांच्या गरजांचा विचार केला जात आहे.
विशेष पादचारी पूल, लिफ्ट आणि बझर
याशिवाय सीएसएमटी स्थानकात विशेष पादचारी पूल आणि लिफ्टची व्यवस्थाही उभारली जात आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर 170 नवीन बझर बसवण्यात आले आहेत, जे दृष्टिहीन व्यक्तींना दिव्यांग डब्यात चढण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
दिव्यांग सहायकांची नियुक्ती
दिव्यांग प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सीएसएमटी स्थानकात वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना 'दिव्यांग सहायक' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे अधिकारी दिव्यांग प्रवाशांना आवश्यक ती मदत पुरवतील आणि त्यांच्या प्रवासाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील.
विशेष सुविधांचा समावेश
मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर दिव्यांग शौचालयांमध्ये रेलिंग बसवण्यात आले आहेत. तसेच ऑक्युपन्सी लाइट्सही लावण्यात आल्या आहेत. यामुळे दिव्यांग प्रवाशांना शौचालयांचा वापर अधिक सुरक्षित आणि सोयीस्कररित्या करता येईल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar