अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये दि. १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखेर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे, तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी, कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. याबाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपायोजना/ पर्यायी व्यवस्था करुन प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दिनांक २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल, नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. यादरम्यान क्षेत्रिय स्तरावरुन आणि तज्ज्ञांकडून प्राप्त होणारे बदल यामुळे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागला. त्यामुळे प्रक्रियेच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. २१ मे २०२५ पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू करणे शक्य झाले नाही. यानंतर संकेत स्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करुन दि. २६ मे २०२५ पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. या बदलाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे) यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार, मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन नंबर, सपोर्ट डेस्क, संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल, ‘करीअर पाथ’ चा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांस काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभाग स्तरावर/ जिल्हा स्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेत स्थळावर देण्यात आलेले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार असल्याने यामध्ये ९३४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून २० लाख ८८ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar