Breaking News
महायुतीत ४० जागांवर वाद होण्याची चिन्हं ? सेना, भाजप, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच;
अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळू शकतो.
चेक डील
मुंबई: लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या महायुतीत ४० जागांवरुन मोठा वाद होण्याची शक्यता आहे. या जागांची यादी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचे इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांनी शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर विधानसभेची तयारी सुरु केली. पण आधी एकनाथ शिंदे आणि मग अजित पवार भाजपसोबत आल्यानं अनेकांची अडचण झाली आहे. त्यामुळे आता जवळपास ४० जागांवरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशी चर्चा केली. स्थानिक पातळीवर वाद सोडवा आणि जागावाटप निश्चित करा. लवकरात लवकर बैठका घेऊन तोडगा काढा. त्यानंतर १० दिवसांत दिल्लीत बैठक घेऊन जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय होईल, अशा सूचना शहांनी दिल्या. स्थानिक पातळीवर प्रश्न न सुटलेल्या जागांचा निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी थेट लढत झाली. शिवसेनेनं १२४ जागा लढवत ५६ जागा जिंकल्या. तर भाजपनं १६४ जागा लढवून १०५ जागांवर बाजी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ५४ जागांवर विजय मिळवला. सध्या अजित पवारांसोबत असलेले ४० आमदार शिवसेना, भाजपच्या उमेदवारांचा पराभव करुन जिंकले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीत गोची झाली आहे.
सिटिंग-गेटिंगच्या फॉर्म्युलानुसार जागावाटप झाल्यास ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला संबंधित जागा सुटेल. पण २०१९ मध्ये युती तुटल्यानंतर भाजपचे पराभूत झालेले उमेदवार, पुढील निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले नेते सक्रिय झाले. शिवसेनेकडून लढलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांनीदेखील २०२४ ची तयारी केली. पण अजित पवारांची महायुतीत एन्ट्री झाल्यानं ४० जागांवर भाजप, शिंदेसेनेची गोची झाली आहे. यातील २८ जागांवर अजित पवारांचे आमदार विरुद्ध भाजपचे इच्छुक असा संघर्ष आहे. तर अन्य जागांवर अजित पवारांचे आमदार विरुद्ध शिंदेसेनेचे इच्छुक अशी रस्सीखेच आहे.
कोणकोणत्या जागांवर पेच?
दिंडोरी- नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी) वि. धनराज महाले (शिवसेना)
चंदगड- राजेश पाटील (राष्ट्रवादी) वि. शिवाजी पाटील (भाजप अपक्ष)
मावळ- सुनील शेळके (राष्ट्रवादी) वि. बाळा भेगडे (भाजप)
इंदापूर- दत्ता भरणे (राष्ट्रवादी) वि. हर्षवर्धन पाटील (भाजप)
वडगाव शेरी- सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) वि. जगदिश मुळीक (भाजप)
हडपसर- चेतन तुपे (राष्ट्रवादी) वि. नाना भांगिरे (शिवसेना)
आष्टी- बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी) वि. सुरेश धस (भाजप)
कोपरगाव- आशुतोष काळे (राष्ट्रवादी) वि. विवेक कोल्हे (भाजप)
अर्जुनी मोरेगाव- मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी) वि. राजकुमार बडोले (भाजप)
अहेरी- धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी) वि. अमरिश राजे (भाजप)
अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी) वि. वैभव पिचड (भाजप)
उमरेड- सुधीर पारवे (भाजप) वि. राजू पारवे (शिवसेना)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे