Breaking News
आदिवासी संघटनाना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढणार
महानगर
मुंबई -आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे. काही सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवतील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले. राज्यातील सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातला आदिवासी आता एकत्र आला आहे. यापुढील काळात त्यांची एकत्रित वाटचाल होणार आहे. या दृष्टीने महाराष्ट्रात तीन ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरवलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील केनगाव येथे 30 सप्टेंबर रोजी, मनमाड येथे 2 ऑक्टोबर रोजी आणि नागपूर या ठिकाणी 5 ऑक्टोबर रोजी. कार्यक्रम होणार आहेत.
विधानसभेच्या 24 मतदार संघामध्ये 22 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. पण 15 टक्क्यांपासून ते 29.9 टक्केपर्यंत लोकसंख्या असलेले 20 मतदारसंघ आहेत. आदिवासी भाग हा प्रदूषण विरहीत भाग आहे आणि या भागाला नेहमीच विकासाच्या नावावर लक्ष्य केले जाते. कुठेही अभयारण्य बांधायचे असेल किंवा नवनिर्माण करायचे असेल, तर सर्वांची नजर आदिवासी क्षेत्रावर पडते असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ज्या भागात आदिवासी राहतो त्या भागात खनिज मोठ्या प्रमाणात आहे. खनिजाचे उत्खनन केले जाते. यातून उरलेले लोक श्रीमंत होतात आणि आदिवासी बेरोजगार, बेघर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तुलेश्वरजी मरकाम, महासचिव शामसिंग मरकाम, प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील गायकवाड, कोलाम आदिम जमात संघाचे सुभेदार माधव टेकाम, एकलव्य आघाडीचे अनिल जाधव, आदिवासी एकता परिषदेचे कैलास माळी, आदिवासी माना समाज संघटनेचे रमेश गजबे, आदिवासी गोंडगवारी युवा शक्तीच्या भगवान भोंडे, आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे विकास कुडमते, जयस संघटनेचे अमित तडवी आदी आदिवासी संघटनांचे आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे