Breaking News
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी संविधान जागर यात्रेचा समारोप
मुंबई - भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने ९ ऑगस्ट पासून महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह तेथून सुरू झालेली ‘संविधान जागर यात्रे’चा समारोप आता केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी दादर येथे होणार आहे.अशी माहिती संविधान जागर समितीचे संयोजक नितीन मोरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रिपब्लिकन युथचे यशवंत गंगावणे,राकेश मोहिते,हिवराळे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोरे म्हणाले की,या संविधान रथाचे मुंबईत आगमन होताच अनेक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये दादर चैत्यभूमी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर रॅलीच्या स्वरूपामध्ये संविधान जागर यात्रा छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर दादर पोहोचल्यानंतर सभागृह मध्ये संविधान जागर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.या समारोप सभेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू व केंद्रीय मंत्री भुपेन्द्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये इतर अनेक मान्यवर मंडळी खासदार, आमदार उपस्थित राहणार असून मुंबई शहरातील तमाम आंबेडकरवादी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ही संविधान यात्रा कोकण भूमीतून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, तब्बल ३० दिवस ६००० किलोमीटर प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहे. खेड्यापाड्यांमध्ये संविधान समजावून सांगण्याचं काम ज्या संयोजन मंडळीनी केले त्या सर्वांचा सत्कार उपस्थित महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक संघटनेच्या प्रमुखांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती नितीन मोरे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade