Breaking News
अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकला खाडीत!
ठाणे - नारपोली पोलिसांनी शिताफीनं तपास करून हत्येचा उलगडा केला. आरोपी प्रियकराला उत्तरप्रदेशमधील लखनौमध्ये सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. तर हत्येच्या कटात सामील पत्नीलाही लखनौमधून ताब्यात घेतलं आहे. अनुभव रामप्रकाश पांडे ( वय २३) असे अटक केलेल्या पत्नीच्या प्रियकराचं नाव आहे. तर बलराम उर्फ शेखर लक्ष्मण मिश्रा (२७) असे हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.
अन् अनैतिक संबध प्रस्थापित झाले- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराम उर्फ शेखर आणि त्याची २५ वर्षीय पत्नी मूळची उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील कुहिडदिया गावाचे मूळचे रहिवाशी आहेत. लग्नानंतर दोघेही भिवंडी तालुक्यातील कशेळी रेतीबंदर रोडवरील दुर्गेश पार्क जवळील ओम साई अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील ३०६ नंबरच्या सदनिकेत राहत होते. त्यातच आरोपी अनुभव पांडे हादेखील याच ओम साई अपार्टमेंटच्या एका सदनिकेत भाडेकरू म्हणून राहत होता. तसेच बलराम उर्फ शेखर आणि आरोपी दोघेही उत्तरप्रदेशमधील रहिवाशी असल्याने ओळख होऊन मैत्री झाली होती. त्यामुळं दोघांचे घरी येणे-जाणे होत होते. मृताची पत्नी आणि आरोपीमध्ये प्रेमाचं सूत जुळून अनैतिक संबध प्रस्थापित झाले.
नातेवाईकानं दिली होती बेपत्ता झाल्याची तक्रार-पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्यानं आरोपीनं मृताच्या पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास बलरामची त्याच्या राहत्या घरातच धारदार शस्त्राने हत्या केली. त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून कशेळी भागात असलेल्या खाडी पात्रात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी बलराम दिसत नसल्याचे पाहून त्याच्या एका नातेवाईकानं नारपोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे आणि नातेवाईकाने दिलेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकानं तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजमुळ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात पोलीस तपासात कशेळी भागातील घटनस्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच आरोपी आणि मृताची पत्नी दिसून येत नसल्यानं पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला. पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अनुभव आणि मृताची पत्नी दोघे जाताना दिसले. त्यानंतर तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या मोबाईलचे लोकेशन उत्तरप्रदेशमधील लखनौमध्ये आढळून आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांनी पोलीस पथकासह स्थानिक पोलिसांच्या मदतीनं लखनौमध्ये जाऊन सापळा रचला. आरोपी आणि मृताच्या पत्नीला ताब्यात घेऊन त्यांना भिवंडीत आणले.
आरोपीनं दिली हत्येची कुबली ... आरोपी अनुभव आणि त्याच्या मित्राच्या पत्नीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. बलरामची राहत्या घरात हत्या करून त्याचा मृतदेह एका बॅगमध्ये कशेळी खाडीत फेकून दिल्याचं सांगितले. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी याप्रकरणी सपोनि रंगनाथराव वडणे यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकरासह पत्नीवर १०३(१) सह २३८,३ (५) न्वये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रियकर अनुभव याला अटक केली आहे. तर मृताची पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहे.
मृतदेहाचा खाडी पात्रात शोध सुरू- अटक केलेल्या आरोपी अनुभवला आज न्यायालयात हजर केले असता २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बलरामचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कशेळी खाडी भागात शोध मोहीम राबवली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम करीत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE