Breaking News
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन
कोलकाता - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य (८०)यांचे आज सकाळीनिधन झाले. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे.कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखानदारी सुरू केली. सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र उभारले. भट्टाचार्य यांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये आयटी आणि आयटी क्षेत्राशी निगडित मोठी गुंतवणूक आणण्यात त्यांना यश आले.
भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. नंतर त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. त्यांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनशी जोडले गेले. त्यांना सीपीआयच्या युवा शाखेचं राज्य सचिव बनवण्यात आलं, जी नंतर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती.
पश्चिम बंगाल आणि एकूणच देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव २००० साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मुख्यमंत्री असताना भट्टाचार्य यांनी डाव्या पक्षांची आघाडी करून २००१ आणि २००६ च्या निवडणुकीत विजय मिळविला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे