Breaking News
नवी मुंबई ः वास्तू बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्सच्या कार्यालयात अकाऊंटंट म्हणून काम करणार्या चंकी मंगलानी याने वास्तू बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्समधील भागीदारांच्या चेकवर खोट्या सह्या करून तसेच परस्पर बँकेचे आर्थिक व्यवहार करून तब्बल पाच कोटी 65 लाख रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे मंगलानी याने आपली चोरी पकडली जाऊ नये, यासाठी डेव्हलपर्सच्या कार्यालयातील हार्ड डिस्क, रेरा अकाऊंटचे पासवर्ड, बँकेचे पासवर्ड, कार्यालयीन डाटा नष्ट केला. या प्रकरणात एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक विलास पाटील, संग्राम पाटील, उत्तम येलमार, सुनील कोळेकर, विजय निकम आणि अजित येलमार या सहा बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन भागिदारीमध्ये वास्तू बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्स ही कंपनी सुरू केली आहे. या कंपनीचे कार्यालय एपीएमसीतील सत्रा प्लाझा इमारतीत आहे. या कंपनीमध्ये असलेल्या सहा भागीदारांपैकी संग्राम पाटील हे मुख्य भागीदार असून त्यांची सही बँकेतील सर्व आर्थिक व्यवहारात महत्त्वाची आहे. वास्तू बिल्डरद्वारे ठिकठिकाणी बांधकामे सुरू असल्याने त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार विविध बँकेमधून चालतात. 2014मध्ये वास्तू बिल्डरच्या भागिदारांनी आपले सर्व आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी चंकी राजकुमार मंगलानी याला अकाऊंटट म्हणून कामाला ठेवले. त्याच्याकडे कंपनीचे चेकबुक, सर्व रेरा अकाऊंटचे पासवर्ड, बँक अकाऊंटचे पासवर्ड, कंपनीच्या ग्राहकांच्या व्यवहाराची सर्व महत्त्वाची माहिती होती.
वास्तु बिल्डरच्या सर्व आर्थिक व्यवहारात भागिदारांच्या व पर्चेस मॅनेजर यांच्या सहीनंतरच पर्चेस ऑर्डर काढल्या जात होत्या. त्यानंतर सगळ्या प्रक्रिया केल्यानंतरच मंगलानी त्या व्यवहारातील चेक बनवून त्यावर संबंधित भागीदाराच्या सह्या घेत होता. वास्तू बिल्डरच्या भागिदारांचा मंगलानी याच्यावर विश्वास असल्याने त्यांनी त्याच्याकडे सर्व आर्थिक व्यवहार सोपविले होते. याचाच गैरफायदा उचलत त्याने वास्तू बिल्डर अॅण्ड डेव्हलपरच्या विविध बँक खात्यातील चेकवर बनावट सह्या करून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली. गेल्या आठवड्यात वास्तू बिल्डरच्या भागिदारांना संशय आल्यानंतर त्यांनी आपल्या बँकेचे व्यवहार तपासल्यानंतर त्यांनी ज्या पुरवठादाराकडून कधीच माल मागविला नव्हता, अशा 11 पुरवठादारांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम वळती झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही पुरवठादारांना कंपनीचे चेक देण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे वास्तू बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्सच्या विविध बँकांचे परस्पर आर्थिक व्यवहार करून तब्बल 5 कोटी 65 लाख रुपयांची अफरातफर केल्याबद्दल सर्व भागिदारांनी याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चंकी मंगलानी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya