Breaking News
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे बीड मध्ये आगमन
बीड – राज्यातील तिसऱ्या मानाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले.पैठणहून निघालेल्या या दिंडीचे जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ग्रामस्थानी स्वागत केले. हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने ही दिंडी मार्गस्थ होत आहे. शिरूर शहरामध्ये येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे फटाके आणि ढोल बँड वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
पायघड्या टाकून त्यावर ही पालखी पुढे पुढे जाते. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा शिरूरकरांनी कायम ठेवली आहे. पालखी दिंडी शिरूर मध्ये आल्यानंतर घरोघरी या पालखी मधील वारकऱ्यांना फराळाचे दिले जाते. या पालखी दिंडीमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक पाहायला मिळाले. स्थानिक मुस्लिम नागरिकांच्या वतीने पालखी मधील वारकऱ्यांना केळी आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
पालखी रथातून उतरवून येथील नागरिक खांदा देऊन गावामध्ये घेऊन आले. दुपारपर्यंत ही पालखी शिरूर येथील हनुमान मंदिरामध्ये ठेवण्यात आली. यावेळी नागरिकांनी या पालखीतील नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर ही पालखी खांद्यावर घेऊन जवळच पाच-सहा किलोमीटर असलेल्या राक्षसभुवन येथे नेण्यात आली. आणि तेथून पुढे ही पालखी पुन्हा रथामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी मार्गस्थ होते. पैठण वरून निघालेली संत एकनाथांची पालखी दिंडी बीड जिल्ह्यातील शिरूर आणि पाटोदा तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade