Breaking News
‘ऑपरेशन सिंदूर’ वरून राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
मुंबई -: भारताने काल रात्री पाकीस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कडक कारवाई करत ९ दहशतवादी तळ नष्ट केले. या कारवाईचे देशभरातून कौतुक होत असून राजकीय नेत्यांनी आणि सामान्य नागरिकांना सोशल मिडियावर पोस्ट करत पाठींबा दर्शवला आहे. मात्र या साऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत या कारवाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
राज ठाकरेंनी दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नसू शकतं असं स्पष्टपणे म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा केला. कोणत्याही देशाविरुद्ध युद्ध पुकारलं नाही, अशी आठवण करुन दिली. तसेच राज ठाकरेंनी दहशतवाद्यांचा शोध घेणं, हा हल्ला का झाला याची माहिती घेणं अधिक महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. “ज्यावेळी पहलगाममधील हा प्रकार घडला तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियला होते. तो दौरा अर्धवट सोडून ते आले. त्यानंतर ते बिहारला आले. ही गोष्ट करायची गरज नव्हती. तिकडे केरळला जाऊन अदानीच्या कोर्टचं उद्धाटन केलं. मग इकडे फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी ‘वेव’चा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे, या तर या गोष्टी टाळत्या आल्या असत्या,” अशा शब्दांमध्ये सुनावलं. “या साऱ्यानंतर मॉक ड्रील करायचं, एअर स्ट्राइक करायचं या सर्वांची काही आवश्यकता नाहीये,” असंही राज म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, “आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जात आहोत. मला वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही, मूळ प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. आज नाक्या-नाक्यावर ड्रग्ज मिळत आहेत. या गोष्टी येतात कुठून याच्या खोलाशी जाणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शाळा कॉलेजमधली लहान लहान पोरं आता ड्रग्ज घ्यायला लागली आहेत. यांच्यापर्यंत ड्रग्ज पोहचतात कसं हे महत्त्वाचं आहे. युद्ध हे काही उत्तर नाही,” असंही म्हटलं.
या कारवाईला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आहे, असं म्हणत राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, “नावंबिवं देऊन भावनिक होण्याचा आणि याचा इथे काही विषय नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की काय करताय? इतक्या दिवस जे काही कार्यक्रम झाले त्याची काही आवश्यकता नव्हती,” असंही उत्तर दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade