Breaking News
संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात सरकार उदासीन.... अॅड. जयमंगल धनराज
वडाळा, मुंबई : भारतातील सर्व नागरिकांना जात धर्म विरहित नागरिकता बहाल करून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारीत जगातील सर्वोत्तम संविधान म्हणून गौरविलेल्या आपल्या संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही ऐतिहासिक घटना आहे. मात्र संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात केंद्र आणि राज्य सरकारे उदासीन दिसत असल्याचे मत ?ड. जयमंगल धनराज यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बुलडाणा जिल्हा बौद्ध रहिवासी मंडळाचे वतीने आयोजित जयंती सोहळ्यात ते बोलत होते. वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात अॅड. धनराज पुढे म्हणाले की, आपल्या शेजारच्या देशांनी अनेक वेळा आपले संविधान बदलून झाले आहे. आणि जगातील लिखित राज्यघटनांचे सरासरी वय 17 वर्षे असताना आपण 75 वर्षे पूर्ण केलीत ही गौरवाची बाब आहे. या 75 वर्षांच्या वाटचालीत जेव्हा जेव्हा संविधानाला धोका निर्माण झाला तेव्हा जनतेने पुढाकार घेऊन लोकशाही मार्गाने संविधानाचे रक्षण केले आहे. विविधतेने नटलेल्या आणि सामाजिक आर्थिक स्तरावर आत्यंतिक विषमता असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्यामध्ये संविधानाचे अनन्यसाधारण महत्व असून देश म्हणून आपण घटनाकारांचे सदैव ऋणी आहोत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार सिद्धार्थ खरात तसेच प्रशासकीय अधिकारी असलेले राजेश धाबरे यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. डी. आर. इंगळे होते. या कार्यक्रमाला मुंबईत स्थायिक झालेले बुलडाणा जिह्यातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade