Breaking News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटकांना सुखरुप आणण्यासाठी काश्मीरला रवाना
मुंबई - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. आपत्कालिन स्थितीत नेहमीच अलर्ट मोड वर राहून लोकांच्या मदतीला धावून जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या आधी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची एक टीम काश्मीरला गेली होती. आता स्वतः एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले आहेत. एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहेत. शिंदे हे रात्री 8 वाजता श्रीनगरला पोहोचणार आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. एकनाथ शिंदे हे सातत्याने काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात आहेत. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर रात्री 10 ते 11 च्या दरम्यान एकनाथ शिंदे हे सर्व पर्यटकांची भेट घेणार आहेत. त्यांना मुंबईत कसं सुखरुप आणलं जाईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या पर्यटकांची जेवणाची सोयही केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांची एक टीम या आधीच काश्मीरमध्ये पोहोचली आहे.
हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन
काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आणण्यात आले आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर