Breaking News
राष्ट्रीय मिल मजदूर संघ ग्रंथालयाला यंदाचा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार!
मुंबई दि.३१:मुंबई मराठी ग्रंथालय शतकोत्तर रौप्यमहोत्सवी"अ" वर्ग शासनमान्य जिल्हा ग्रंथालय यांच्या सहकार्याने आणि ब्रहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक अधिवेशनात,आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाला यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथालय हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.गतवर्षांपासून ग्रंथ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला आहे.सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सन १९७२ पासून कार्यरत असलेल्या रा.मि.म.संघ ग्रंथालयात विविध विषयांवरील सुमारे ३५ हजार ग्रंथ असून,आज नोंदणी केलेल्या सभासदापैकी एकूण १८०० पैकी १००० वाचक या ग्रंथालयाचे नियमित सभासद आहेत.कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या या ग्रंथालयाने गेल्या ५३ वर्षात गिरणगावातील नामवंत वाचनालय म्हणून आपल्या निष्ठापूर्वक कामातून ओळख निर्माण केली आहे.या गोष्टींचा पुरस्काराची निवड करताना विचार करण्यात आला.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी मागील विधानसभा अधिवेशन प्रसंगी विधानपरिषदेत एकूण वाचनालयांच्या समस्येला वाचा फोडली होती. वाचनालयाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची मागणी करताना,सदर ग्रंथालयाच्या कार्याची माहिती त्यांनी दिली होती. रा.मि.म.संघ ग्रंथालयाने उत्तम सेवा बजावतांना सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल,जिल्हा ग्रंथालय संघातर्फे सर्वोत्कृष्ट ग्रंथालय म्हणून निवड करण्यात आली.समारंभाचे अध्यक्ष दिलीप पांडुरंग कोरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दादर येथील मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या कै.प्रा.गावस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभागृहात वार्षिक अधिवेशन पार पडले.या प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन,ग्रंथ विक्री आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोकण विभाग ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप कोरे होते. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक संगीता अरबुते आणि अन्य मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
रामिम संघ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे अध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या पुरस्काराचे स्वागत केले आहे.
हा पुरस्कार उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर,मारुती शिंत्रे, मधू घाडी, ग्रंथपाल ममता घाडी, दीपक वाळवे,आदी मान्यवरांनी स्वीकारला.या प्रसंगी मुंबई मराठी ग्रंथालयाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.त्यावेळी काही वैयक्तिक पारीतोषिकेही प्रदान करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर