Breaking News
DRDO कडून ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित
नवी दिल्ली - ड्रोनचा पाडाव करण्यासाठी DRDO ने स्वदेशी बनावटीची ‘डी ४’ ही ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित केली आहे. सध्या जगभर ड्रोन हे शस्त्र म्हणून वापरले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मानवी हानी टाळण्यासाठी ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी केला जात असल्याचे जगभरात दिसत आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने ‘डी ४’ या नावाने ड्रोनचा शोध घेत , लक्ष्य करून व नष्ट करणारी यंत्रणा तयार केली. ही यंत्रणा लवकरच देशाच्या महत्त्वाच्या शहरी भागात तैनात केली जाणार आहे.
ही ‘डी ४’ यंत्रणा सीमेवर तैनात केली आहे. याचा वापर घुसखोरी रोखायला, ड्रोन पाडायला केला जात आहे. तसेच शस्त्रास्त्र डेपो, हवाई दलाचे तळ, कम्युनिकेशन सेंटर, सीमांवरील चौक्या येथे केला जात आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांकडून या यंत्रणेचा वापर सुरू झाला आहे.
ड्रोन सध्याच्या घडीला वापरले जाणारे बहुपयोगी यंत्र आहे. संरक्षण व बिगर संरक्षण क्षेत्रात ड्रोनचा वापर केला जातो. पाकिस्तानातून भारतात हेरगिरी किंवा अन्य कामांसाठी ड्रोनचा वापर झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे सावध होत भारताने ही ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली. ही यंत्रणा ड्रोन कुठे आहे हे शोधून त्याच्यावर मारा करून त्याला उद्ध्वस्त करते. ही यंत्रणा तत्काळ ड्रोनचा माग काढते. त्यानंतर लेझरवर आधारित यंत्रणा ड्रोनला पाडते. ही यंत्रणा ३ किमीच्या अंतरापर्यंत काम करते.
‘डीआरडीओ’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, हे ‘इंटरसेप्टर ड्रोन’ उड्डाणादरम्यानच शत्रूच्या ड्रोनना स्वतंत्रपणे हाताळतील. हे ड्रोन भूप्रदेश, धोक्याची पातळी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेग, अचूकतासह डिझाइन केलेले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर