Breaking News
पर्यटन बचाव समितीकडून माथेरान बेमुदत बंद
माथेरान - मुंबईकरांचे हक्काचे पर्यटनस्थळ रायगड जिल्ह्यातील माथेरान पर्यटकांच्या होणाऱ्या लुबाडणूकीमुळे आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय माथेरान पर्यटन बचाव समितीने घेतला आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत पर्यटन बचाव समितीने बंद पुकारला आहे. पर्यटकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात संपूर्ण माथेरान बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
माथेरानच्या दस्तुरीपासून बाजारपेठ अवघ्या अडीच किलोमीटरच्या अंतरावर पर्यटकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या विरोधात आज माथेरानमध्ये कडेकोट बंद पुकारला. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने पर्यटकांची कोंडी झाली. पर्यटकांची फसवणूक होत असल्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम होत आहे. ही फसवणूक बंद होण्यासाठी पर्यटन बचाव संघर्ष समितीने बेमुदत बंदची हाक पुकारली आहे.
माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बंद पुकारला आहे. बंदला हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले आहे.स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, असा आरोप देखील संघटनेने केला आहे.
दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले, कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे. या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत माथेरान हे बंदच राहणार आहे. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्या आणि माथेरान पुन्हा एकदा पर्यटनसाठी खुला करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केले आहे.
पर्यटन बचाव समितीचे आक्षेप
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना गावात आणण्याऐवजी बळजबरीने पॉइंट्स दाखवून उशिरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते.
मिनी ट्रेन बंद आहे. ई-रिक्षाचा वापर फक्त स्थानिकांसाठी आहे,अशी खोटी माहिती दिली जाते.
या ठिकाणी असणारे घोडेस्वार स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल करतात. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत असल्याचा करण्यात आला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर