Breaking News
नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कटाचा भाग, सरकारचा दावा
मुंबई -नागपूरमध्ये झालेली घटना ही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट करून केलेला हल्ला आहे असं सांगत कोणालाही सोडणार नाही , दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल , पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा रोखठोक हिशेब होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री आणि सभागृहनेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत याबाबत निवेदन देताना दिली. राज्य अस्थिर करण्यासाठी अशाप्रकारचे कट रचले जात आहेत असा आरोप त्यांनी केला.
कालच्या घटनेत ३३ पोलीस जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आले. काँग्रेसनं औरंगजेबाची कबर संरक्षित केली असा आरोप करत औरंगाजेबाचं उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही असं सांगत आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत असे शिंदे दोन्ही सभागृहात म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेत एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबठा पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्चीसाठी काँग्रेससोबत युती केली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.लोकसभेच्या निवडणुकीत दहशतवादी याकूबची कबर कोणी सजवली , पाकिस्तानचे झेंडे कोणी नाचवले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींची माफी मागून पुन्हा युतीत येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेना उबाठा पक्षप्रमुखांनी पलटी मारली अशी टीका त्यांनी केली.
त्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत पोलिसांचं दुर्लक्ष झाल्यामुळे नागपुरात कालचा प्रकार घडला असं ते म्हणाले. धार्मिक उन्मादाचे पडसाद कालच्या घटनेतुन उमटले असं ते म्हणाले. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी देखील या स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं.
भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मोठ्या कटाचा भाग असल्याचं सांगत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. नागपूरच्या मुद्यावरून विधानपरिषद सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade