Breaking News
पश्चिम घाटातील वृक्षांच्या वाढीबाबत महत्त्वाचे संशोधन
मुंबई - जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटातील दुर्मिळ वृक्षराजींबाबत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. पश्चिम घाटातील डोंगरांवरील झाडांची घनता केवळ पावसावर नाही, तर डोंगर उताराच्या दिशेवरही अवलंबून असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पश्चिम घाटात उत्तर किंवा पश्चिम दिशेच्या डोंगर उतारावरील झाडांची संख्या आणि उंची दोन्ही जास्त असून, दक्षिण आणि पूर्व बाजूला उतार असलेल्या डोंगरावरील झाडांची संख्या कमी आणि उंचीही कमी असल्याचे आढळून आले आहे.
शास्त्रज्ञांनी पश्चिम घाटातील २५ संरक्षित क्षेत्रांतील डोंगरावरील झाडांची घनता आणि उंची या बाबता अभ्यास केला. पृथ्वी आणि हवामानशास्त्र विभागातील डॉ. श्रेयस माणगावे यांच्यासह संशोधक विद्यार्थिनी देवी माहेश्वरी, सृष्टी कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे डॉ. गिरीश जठार, जीआयएस सल्लागार शाम दवंडे यांचाही या संशोधनात सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध एन्व्हायर्न्मेंटल कम्युनिकेशन या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
सूर्य किरणांमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा दक्षिण आणि पूर्व उतारावरील जमिनीच्या ओलाव्यावर आणि झाडांच्या वाढीवर विपरित परिणाम होत असल्याचे या संशोधनात दिसून आले आहे. साधारण जूनमध्ये दक्षिणायन सुरू होते. याच काळात सप्टेंबरपर्यंत पाऊस पडत असतो. मात्र, पुढे ऑक्टोबर ते मेपर्यंत पाऊस नसतो. या दरम्यान दक्षिण दिशेला असलेला डोंगर उतार तापून जमिनीचा ओलावा लवकर नाहीस होतो. परिणामी वृक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने दक्षिणेला डोंगर उतारावरील झाडांची संख्या कमी राहते. त्याचबरोबर त्यांची वाढही कमी होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade