Breaking News
पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी लागू होणार टोकन पध्दत
पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी झटपट दर्शन मिळावे यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर आता पंढरपुरातही टोकन दर्शन व्यवस्था राबवण्यात येणार आहे. येत्या आषाढी यात्रेपूर्वी या व्यवस्थेची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे काल मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी मंदिर जतन व संवर्धन कामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सध्या गाभारा, बाजीराव पडसाळी, सभामंडप व इतर अनुषंगिक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार आहेत.
दगडी कामास कोटिंग करणे व वॉटर प्रूफिंगची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्याची आषाढी यात्रेपूर्वी चाचणी घेण्यासाठी व मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या संगणक प्रणाली सेवाभावी तत्त्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीची विनंती टीसीएस कंपनीने मान्य केली आहे.त्यामध्ये ऑनलाइन डोनेशन, भक्तनिवास बुकिंग,पूजा बुकिंग,लाईव्ह दर्शन व इतर अनुषंगिक बाबींसाठी संगणक प्रणालीचा समावेश आहे.
प्रतिवर्षी चैत्र शुद्ध ११ कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी ४ एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधी २ ते १२ एप्रिल असा आहे.या यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये या यात्रेला येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant