Breaking News
मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती परस्पर माध्यमांना देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग
मुंबई - बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संतप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली आणि त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह तथा जनतेची दिशाभूल केली. सरपंच हत्येमध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी आरोपी आहेत पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सरआरोपी केले पाहिजे, अशी मागणी उद्या सभागृहात करु असे नाना पटोले म्हणाले.
औरंगजेबाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे पण तेच बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून सभागृह बंद पाडत आहेत, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रशांत कोरटकरने अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केला त्याच्यावर सरकार कडून काहीच बोलले जात नाही. महाराजांचा अपमान करणारे काही जण मंत्रिम़ंडळातही आहेत. जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल तर त्याचे समर्थन कसे करता, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade