Breaking News
नवी मुंबई : एपीएमसी दाणाबंदरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया लुटण्यासाठी आलेल्या टोळीने सायरनच्या आवाजामुळे पळ काढल्याने बँकेवरील दरोडा टळला. रविवारी पहाटे ही टोळी पाच ठिकाणच्या ग्रीलचे लॉक तोडून बँकेच्या आतमध्ये पोहोचली होती; परंतु रोकड असलेल्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच सायरन वाजल्याने त्यांना तिथून पळ काढला.
सदर बँक दाणाबंदरच्या यू गल्लीच्या पहिल्या मजल्यावर असून गल्लीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर ग्रीलचे दरवाजे आहेत. त्यापैकी मुख्य मार्गाच्या दिशेच्या ग्रीलचे लॉक तोडून ही टोळी यू गल्लीत पोहोचली. त्यानंतर पहिल्या मजल्यापर्यंतचे तीन ग्रीलचे लॉक ब बँकेचे मुख्य शटर तोडून ही टोळी बँकेत पोहोचली. रोकड लुटण्याच्या प्रयत्नात त्यांनी बँकेतील लॉकर रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु दरवाजाला सुरक्षा असल्याने त्याचा सायरन वाजण्यास सुरुवात झाली. मोठमोठ्या आवाजात हा सायरन वाजू लागल्याने पकडले जाऊ या भीतीने त्यांना पळ काढावा लागल्याने थोडक्यात बँकेवरील दरोडा टळला. बँकेच्या सायरनचा आवाज होताच परिसरात रात्रगस्तीवर असलेल्या एपीएमसीच्या सुरक्षा कर्मचार्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली; परंतु अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांची टोळी त्या ठिकाणावरून पळून गेली. तर बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे बँकेच्या मॅनेजरला कळताच त्यांनी एपीएमसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, पाच ग्रील व एक शटर वाकवून टोळी बँकेत घुसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार बँक लुटीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात टोळीविरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya