Breaking News
बदलत्या जीवनात वाढत असणारे जे विकार आहेत त्यामधील एक म्हणजे मणक्यांचे विकार! आपल्या दैनंदिन क्रियांमधील चुका या असे विकार उत्पन्न होण्यासाठी आणि असलेला विकार बळावण्यासाठी मदत करतात, असे आढळते. त्यामुळे मणक्याचे विकार उत्पन्नच होऊ नयेत आणि ज्यांना विकार झालेला आहे त्यांचे विकार वाढू नये, तसेच तो लवकर बरा व्हावा, या उद्देशाने सर्वांनीच काय सावधानता बाळगावी याचे मार्गदर्शन आज करीत आहे.
प्रवासातील काळजी
प्रवास हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे खरे, परंतु विश्रांती न घेता सततचा प्रवास टाळावा. तसेच कच्च्या रस्त्यावरील सतत दणके बसणारा प्रवास, बसमधील मागच्या सीटवरील प्रवास यामुळे मणक्यावर ताण येत असतो. पाठीवर वजन घेऊन जास्त चालणे, वारंवार जड वजन उचलणे याचाही ताण येत असतो. यामुळे या गोष्टी करताना जागरूक असणे महत्त्वाचे. ज्यांना विकार झालेला असेल अशांनी या गोष्टी टाळणे महत्त्वाचे असते.
गाडी चालवताना आपली पाठ पूर्णपणे सीटला टेकलेली आहे ना? याची काळजी घ्यावी, तसेच पायाचे अंतर व स्टीयरिंगमधील अंतर यामध्ये गाडी चालविताना अतिरिक्त ताण राहू नये, याची काळजी घ्यावी.
दैनंदिन क्रियांमधील दोष - मानेसाठी
वारंवार जड वजन डोक्यावर घेणे, खाली मान घालून सतत काम करणे, महिलांमध्ये धान्य निवडणे, शिवणकाम, जास्त पोळ्या लाटणे टाळणे महत्त्वाचे असते. कॉम्प्युटरवर सतत एका स्थितीमध्ये काम करणे, मान वाकडी घालून सतत वाचन करणे किंवा दीर्घकाळ लिखाण करणे, काम करण्याच्या ऑफिस टेबलाची उंची अति कमी किंवा अति जास्त असणे, झोपताना जास्त जाड उशी वापरणे, वारंवार मान मोडण्याची सवय असणे, या सर्व गोष्टींचा मानेच्या मणक्यांवर ताण येत असतो, म्हणूनच मानेच्या मणक्यांच्या विकारापासून दूर राहण्यासाठी आणि ज्यांना विकार झालेला असेल त्यांनी तो लवकर बरा होण्यासाठी या गोष्टी सदैव टाळ्याव्यात.
दैनंदिन क्रियांमधील दोष - कमरेसाठी
सतत जास्त पाठ न टेकता मांडी घालून बसणे, कमरेत वाकून सतत काम करणे, विश्रांती न घेता शेतातील भांगलणीचे काम, खाली वाकून वारंवार जड वजनाची वस्तू उचलणे, वारंवार लहान मुलाला उचलून घेणे, जड वस्तू जोर लावून ढकलणे, बंद पडलेली गाडी ढकलणे, जड वजनाची दुचाकी स्टॅण्डवर लावणे, स्टॅण्डवरून काढणे ही क्रिया वारंवार करणे, मोठ्या बादलीने, जड घागरीने पाणी भरणे, खाली बसून कपडे धुणे, जड पिशवी किंवा बॅग हातात धरून जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे, या सर्व गोष्टीमुळे कमरेच्या मणक्यांवर ताण येत असतो. त्यामुळे कमरेच्या मणक्याच्या रक्षणासाठी या गोष्टी करताना जागरूक राहावे आणि जर कमरेच्या मणक्याचा विकार असेल तर मग या गोष्टी पूर्णपणे काही दिवस टाळाव्यात, असे माझे मत आहे.
घातक तात्पुरते उपाय
पाठदुखी, कंबरदुखी असणारे अनेक जण लहान मुलाला पाठीवर उभे करून चेपून घेणे, अशास्त्रीय पद्धतीने कंबर जोरात रगडून, चोळून घेणे, शिरा मोकळ्या करून घेणे, मान मोडून घेणे इ. उपचार घेतात. काही वेळाने तात्पुरता आराम मिळत असला तरी अनेक वेळा यातून मणक्यामधील चकतीला, शिरांना इजा होऊन तो बळावण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा तात्पुरत्या उपचारांपासून नेहमीच दूर राहवे. अनेक जण मानदुखी किंवा कंबरदुखीवरील वेदनाशामक गोळी तात्पुरती घेत असतात. यामुळे तेवढ्यापुरते बरे वाटले तरी मुख्य कंबरदुखीचे कारण दुर्लक्षित राहते, त्यामुळे मणक्याचा विकार आता वाढत जातो, तसेच काही जणांना अशा वेदनाशामक गोळ्या खाण्याची सवय लागू शकते. अनेक वेदनाशामक रासायनिक औषधांचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट) भोगावे लागू शकतात. त्यामुळे मानदुखी किंवा कंबरदुखी वारंवार जाणवू लागल्यास वेळ न दवडता वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.
हवामानाचा संबंध
थंड हवेच्या संपर्काने हे विकार वाढत असल्याचेही आढळते. त्यामुळे थंड हवेत उघडे राहणे, सतत पंख्याखाली काम, सतत एअर कंडिशनमध्ये काम, गाडीमधील एसी सतत सुरू ठेवून प्रवास करणे, सतत पावसात भिजणे, भिजलेल्या अवस्थेत काम करणे, थंडीत पांघरून न घेता झोपणे, कडाक्याच्या थंडीत किंवा पावसाळ्यातील गारठ्याची अंघोळ, गार फरशीवर झोपणे, या गोष्टी सदैव टाळ्याव्यात. मणक्याचा विकार झालेल्यांनी शरीर जेवढे उबदार ठेवता येईल तेवढे ठेवावे. त्यामुळे या विकारात लवकर आराम मिळतो, असा माझा अनुभव आहे.
हानिकारक चुकीचा व्यायाम
खरेतर शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे तज्ज्ञाच्या सल्ल्याने केलेले आपल्या प्रकृतीचा, मणक्यामधील दोषांचा विचार करून केले जाणारे विविध व्यायाम हे मणक्याच्या विकारांचे रामबाण औषध आहे. हे खरे असले तरी अनेकदा चुकीचे व्यायाम या विकारांना निमंत्रण देणारे ठरतात किंवा विकार वाढणारे ठरतात असेही आढळते.
वजन कमी करण्यासाठी, डायबेटीस कमी व्हावा म्हणून, छंद म्हणून, वेळ घालविण्यासाठी अतिप्रमाणात चालणे, प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम प्रकार करणे, बॉडी बिल्डिंसाठी जास्त वेटलिफ्टिंग अथवा जिममधील विविध यंत्रांनी तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय जास्त अतिव्यायाम प्रकार करणे, लवकर तब्बेत सुधारावी म्हणून प्रमाणापेक्षा जास्त जोर बैठकांचा व्यायाम करणे यासारख्या गोष्टी करताना प्रत्यक्ष त्याक्षणी शरीर वॉर्मअपमध्ये असल्याने त्रास जाणवत नाही, पण मणक्यांवर, स्नायूंवर निश्चितपणे जादा ताण येत असतो. यातून लगेच त्रास होईलच असे नाही, पण अनेकदा भविष्यात हीच माणसे मणक्याच्या विकारांनी त्रस्त झालेली आढळतात म्हणूनच या सर्व ‘अति’ गोष्टी नेहमी टाळ्याव्यात. ‘अति सर्वत्रम वर्ज्ययेत’ असे शास्त्राने सांगितलेले आहे.
उपयुक्त एमआरआय तपासणी
काही वेळा मणक्याच्या विकाराच्या सखोल निदानासाठी एमआरआय ही आधुनिक तपासणी करणे आवश्यक असते. अनेक जण ‘एमआरआय’ म्हणजे नंतर ऑपरेशनच करावे लागणार अशा भीतीने तपासणी करण्याचे टाळत असतात. वास्तविक एमआरआयमध्ये दोष निघाल्यानंतर प्रत्येक वेळी ऑपरेशनच करावे लागते असे अजिबात नाही. मणक्यामधील चकती सरकली आहे काय? मज्जारज्जूला सूज आली आहे काय? मज्जारज्जूची पोकळी बारीक झाली आहे काय? मज्जारज्जूवर दाब पडत आहे काय? मणक्यातून बाहेर पडणार्या शिरांतून वर दाब पडत आहे काय? किंवा नस दबली आहे काय? यासारख्या अनेक गोष्टींचे निदान एमआरआयमधून होत असते, त्यामुळे विकार पूर्ण बरा होऊ शकेल काय? तसेच तो बरा होण्यास किती कालावधी लागेल? यासाठी कोणते उपचार करावे लागतील? पंचकर्म उपचार किती दिवस करावे लागतील? विकार बरा होईपर्यंत कोणती काळजी घ्यावी लागेल? व्यायाम नक्की कोणते करावे लागतील? विकार पुन्हा होऊ नये म्हणून मार्गदर्शन एमआरआयमधील दोष अभ्यासल्यानंतर अधिक सविस्तरपणे करता येते, असा माझा 14 वर्षांचा अनुभव आहे. म्हणून तज्ज्ञांनी एमआरआयचा सल्ला दिल्यास टाळाटाळ न करता ही तपासणी करून घेणे रुग्णांच्या फायद्याचे ठरते, असे माझे मत आहे.
आयुर्वेदिक उपचार व व्यायामाचे महत्त्वपूर्ण योगदान मणक्याच्या विविध विकारांच्या उपचारांमध्ये शास्त्रीय आयुर्वेद उपचार व विशिष्ट असे व्यायाम हेच जास्त फलदायी व सुरक्षित असल्याचे सर्वत्र अनुभवास येत आहे. विविध आयुर्वेदीय औषधे, औषधी तेलांनी शास्त्रीय अभ्यंग औषधी पाल्यांनी, तेलांनी अथवा शिरोधारा इ. पंचकर्म उपचार, विशिष्ट आहार घेणे, आवश्यक तेवढे दोषानुसार सांगितलेले व्यायाम आणि या लेखात सांगितलेली काळजी घेणे या सर्वांच्या एकत्रित उपचाराने मणक्याच्या विकारात निश्चित चांगला उपयोग होतो.
डॉ. आनंद ओक, आयुर्वेदाचार्य
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya