Breaking News
मुंबई दि १३:नऊ जुलैच्या गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर १४ कामगार संघटना "वांगणी-शेलू" प्रकरणातून संतप्त होऊन एकत्र आल्या,एकूण १ लाख ५० हजार कामगारांपैकी एकही कामगार घरापासून वंचित राहता कामा नये आणि आता मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत या आक्रोशातून"गिरणी कामगार संयुक्त लढा समिती" जन्माला आली.आझाद मैदानावर आयोजिलेले आंदोलन जिंकू किंवा मरू या इर्शैने पेटले म्हणूनच ते अभूतपुर्व आणि यशस्वी ठरले आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील कामगारांनी त्यासाठी जो भरघोस प्रतिसाद दिला,त्याबद्दल त्यांचे लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर आणि निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी आभार मानले आहेत.तसेच राजकीय क्षेत्रातूनही या लढ्याला मोठाच पाठिंबा लाभल्याने कामगारांचे मनोबळ उंचावण्यास मोलाची मदत झाली आहे.
उबाठा-शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तर शिवसेनेचा पाठिंबा जाहीर करून मेळाव्याला संबोधित करताना एकीची वज्रमूठ अधिक मजबूत ठेवावी,असे बहुमोल मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनीही आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहिर करून,पक्षाचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी गिरणी कामगारांना मार्गदर्शन केले.खासदार अरविंद सावंत,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि
माजीमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड तसेच कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा देतांना आमदार भाई जगताप यांनी आपल्या भाषणातून जे अनमोल विचार मांडले ते उपयुक्त ठरले आहे. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी,मनोज जामसूदकर, आमदार महेश सावंत इत्यादी विविध पक्षातील नेत्यांनी उपस्थित राहून, एकी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
विधानसभा आणि विधानपरिषदेत तसेच विधानभवनाच्या पाय-यांवर विरोधी पक्षाने आंदोलन करुन घरांच्या प्रश्नामागील गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर मोठाच निर्णय घेतला आहे,हेच खरे तमाम कामगारांच्या लढ्याच्या यशाचे गमक आहे,असे सांगून सचिनभाऊ अहिर, गोविंदराव मोहिते यांनी युती सरकारलाही धन्यवाद दिले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत,तसेच आमदार प्रसाद लाड यांनी शिष्टाईच्या निमित्ताने आंदोलनात भाषण करून कामगारांच्या मागण्या विषयी अनुकूलता दाखविली आहे.या शिष्टाईच्या दूस-याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील सभा दालनात,१) गिरणी कामगारांना मुंबईत आणि मुंबई लगतच्या उपनगरात घरे देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.२) अध्यादेशातील जाचक कलम १७ रद्द केले,३) कोन पनवेल येथील घराचा जुना प्रश्न सोडवतानाच मासिक देखभाल खर्च कमी केला,इत्यादी मागण्या मार्गी लावल्या.त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक,आमदार प्रसाद लाड त्याचप्रमाणे प्रधान सचिव, उद्योग, गृहनिर्माण आदी संबंधित खात्याचे सचिव उपस्थित होते.सर्वसंबंधितांनी गिरणी कामगारांच्या २० वर्षाच्या लढ्याला अखेर न्याय मिळवून दिला आहे,त्या बद्दल सर्वांचे आभार मानले आले आहेत.
शेवटी सर्वच सहयोगी कामगार संघटनांनी आप-आपल्या युनियनचे झेंडे बाजूला ठेवून घरांच्या प्रश्नावरील कामगारांची एकजूट कायम ठेवली. विशेषतः हा लढा शांतता, संयमी मार्गाने लढविला आणि हा ऐतिहासिक विजय घडवून आणला आहे,त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन,लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर आणि निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी केले आहे. सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांनी, लढा समितीचे प्रमुख सचिन अहिर यांनी ज्या कुशाग्र बुद्धीने आणि मेहनतीने हे यश मिळवून दिले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेत्यांनी गिरणी कामगारांचे हे आंदोलन,न भूतो न भविष्यती ठरविले आहे,अशी प्रतिक्रिया आज लोकमानसात उमटून आलेली दिसते!
•••••KNM
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant