Breaking News
पाकचा आडमुठेपणा – पहलगाम हल्ल्याची चौकशी चीन, रशियाने करण्याची मागणी
इस्लामाबाद - पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारून नेहमी प्रमाणेच पाकिस्तानने आडमुठेपणा करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पाकमधील मंत्री भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत चीन आणि रशियालाही समाविष्ट करावे अशी पाकिस्तानची मागणी आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रशियन मीडिया रिया नोवोस्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान मोदी खरे बोलत आहेत की खोटे बोलत आहेत याची आंतरराष्ट्रीय पथकाने चौकशी करावी.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला. यामध्ये, शोध दरम्यान सापडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांना आधार म्हणून घेतले आहे. दरम्यान, माजी लष्करप्रमुख व्हीके सिंह म्हणाले की, सरकार पहलगाम मुद्द्यावर कारवाई करत आहे. धीर धरा. काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, कोणतीही गुप्तचर यंत्रणा सुरक्षित नसते. इस्रायली एजन्सींनाही हमासच्या हल्ल्याची माहिती नव्हती.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांत सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात १० दहशतवाद्यांची घरे उडवून दिली आहेत. गेल्या दोन दिवसांत २७२ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. १३ राजनयिक अधिकाऱ्यांसह ६२९ भारतीय पाकिस्तानातून परतले आहेत. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून २६ पर्यटकांची हत्या केली. तेव्हापासून, सुरक्षा दलांकडून खोऱ्यात शोध मोहीम सुरू आहे.
सिंधु पाणी करारावर स्थगिती आणल्यामुळे पाकिस्तान भयभीत होऊन भारताविरुद्ध बेताल वक्तव्य करत असल्याचे दिसत आहे. दिवसागणिक धोरण बदलणाऱ्या पाकच्या या आक्रस्तापणाला भारत आता कसा पायबंद घालतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar