Breaking News
आमदार सचिनभाऊ चषक राज्य स्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्य स्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहीलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या पुष्कर गोळेचे आव्हान १३-९ असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. दमदार प्रारंभासह ९-० अशी आघाडी घेणाऱ्या पुष्कर गोळेला अखेर अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर, सिध्दीविनायक प्रसाद व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
परेल येथील वातानुकुलीन आरएमएमएस सभागृहामधील उपांत्य सामन्यात पुष्कर गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतचा ९-७ असा तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिर-दादरच्या सोहम जाधवचा ९-१ असा पराभव केला. स्पर्धेमध्ये आर्यन राऊत व सोहम जाधवने उपांत्य उपविजेतेपद; पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या निधी सावंत व अद्वैत पालांडे, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, एसव्हीएस इंग्लिश स्कूलचा समीर कांबळे यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद तर अमेय जंगम, गौरांग मांजरेकर, शिवांश मोरे, प्रेक्षा जैन, वेदांत पाटणकर, तीर्थ ठक्कर, साईराज साखरकर, उमैर पठाण यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद जिंकले. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४० कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. शालेय खेळाडूंना मार्गदर्शनासह प्रोत्साहन देण्यासाठी १ मे रोजी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar