Breaking News
२३ मार्चपासून ४८ तासांचा देशव्यापी बँक संप !
मुंबई - देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून २५ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत ४८ तास संप पुकारण्याची घोषणा केली आहे. या संपामध्ये देशभरातील ८ लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती यू.एफ.बी.इ.यू.चे निमंत्रक देविदास तुळजापुरकर यांनी मुंबई प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पुढील मागण्यांसाठी संपाचे आवाहन केले आहे – बँकांमध्ये भरती वाढवावी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना नियमित करावे, बँकांसाठी आठवड्यातून पाच दिवसांचा कामकाज सुरू करावा, बँक कर्मचाऱ्यांना असभ्य ग्राहकांकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षेची हमी द्यावी, PSBs मधील कामगार अधिकारी संचालकांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्यात,
ग्रॅच्युइटी मर्यादा वाढवून २५ लाख रुपये करावी आणि त्याला करसवलत द्यावी,कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी लाभांवर आयकर लागू करू नये,
PSBs मधील धोरणात्मक बाबींवर सरकारचे अति-व्यवस्थापन थांबवावे,बँकिंग क्षेत्रातील अन्यायकारक कामगार पद्धती थांबवाव्यात इत्यादी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.
या संपाचा एक भाग म्हणून २४ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन होणार आहे. यामध्ये ३ ते ५ हजार कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना देविदास तुळजापुरकर यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून बँकांमध्ये पुरेशी भरती होत नाही, ज्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. आठवड्यातून पाच दिवसांचा कामकाज हा इतर वित्तीय संस्थांमध्ये लागू आहे, मात्र बँक कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. सरकारने त्वरित निर्णय घेऊन संप टाळावा.”
आज सायंकाळी ४ वाजता दिल्लीमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. या चर्चेत तोडगा न निघाल्यास २३ व २४ मार्च रोजी देशभरात बँका बंद राहण्याची शक्यता आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने जनतेची सहानुभूती मिळवण्याचे आवाहन केले आहे. या संपामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन गरजेचे आहे, असे तुळजापुरकर यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar