Breaking News
व्हॉट्सॲपवरून लग्नपत्रिका पाठवून स्कॅमर करतायत लूट
मुंबई - सध्या लग्नसराई सुरु झालेली असताना ऑनलाईन लुटमार करणाऱ्या स्कॅमर्सनी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. हिमाचल प्रदेश पोलीसांच्या सतर्कतेमुळे हा फ्रॉड समोर आला आहे. दूर राहणाऱ्या नातलगांना व्हॉट्सॲपवरून लग्नाची पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड सध्या वाढला आहे. याचाच फायदा हे स्कॅमर उचलताना दिसत आहेत. तुमच्या फोनवर असे आमंत्रण आल्यास सावध राहण्याचा इशारा हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिला आहे. स्कॅमर डिजिटल लग्नपत्रिका पाठवून लोकांच्या फोनमध्ये मालवेअर पसरवत आहेत. हे कार्ड डाउनलोड केल्यावर या मालवेअरद्वारे वैयक्तिक डेटा शेअर करण्यास सांगितले जात आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घोटाळे करणारे व्हॉट्सॲपद्वारे लग्नाचे आमंत्रण म्हणून एपीके फाइल्स पाठवत आहेत. एखादी व्यक्ती ही फाईल डाउनलोड करताच फोनमध्ये मालवेअर पसरतो. हे फोनमधून वैयक्तिक माहिती चोरते आणि स्कॅमरना पाठवते. या वैयक्तिक माहितीमध्ये बँक खात्याचे तपशील, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तपशील, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचे तपशील, एफडी किंवा कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्याचे तपशील इत्यादी स्कॅमरपर्यंत पोहोचतात. तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्डचा फोटो फोनमध्ये सेव्ह केला असेल तर त्याची माहितीही घोटाळे करणाऱ्यांपर्यंत पोहोचते. सर्व माहिती घेतल्यानंतर स्कॅमर तुमच्या नकळत खात्यातून पैसे काढू शकतात.
तुमच्या फोनवर कोणाच्या लग्नाचे आमंत्रण आले असेल तर ते डाउनलोड करण्यापूर्वी सावध व्हा. प्रथम ती एपीके फाइल आहे का ते तपासा. अशा फाईलच्या खाली APK लिहिलेले असते. अशी फाइल असेल तर ती डाउनलोड करणे टाळा. ते निमंत्रण जाणकार व्यक्तीच्या नंबरवरून आले तरी फाईल डाउनलोड करू नका.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे