Breaking News
ओवेसींकडून वक्फ दुरुस्ती विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नवी दिल्ली - लोकसभेत मंजूर झाल्यानंतर काल मध्यरात्रीनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुर झाले. या विधेयकाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला जात आहे. असे असतानाच आता काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद तसेच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैससी यांनी या विधेयकाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आता विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याआधी केंद्र सरकारला कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे.
संसदेने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केल्याच्या विरोधात देशात निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजनंतर, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये पोलिस हाय अलर्टवर आहेत. ध्वज मार्च सुरूच आहे. लखनौमधील दर्गे आणि मशिदींवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अश्फाक सैफी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्याच्या मेहुण्याला मारहाण करण्यात आली.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुस्लिम समुदायातील शेकडो लोक रस्त्यावर जमले. त्यांच्या पोस्टर्स आणि बॅनरवर लिहिले होते – वक्फ बिल परत घ्या, यूसीसी नाकारा. लोकांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. जमावाने “हुकूमशाही चालणार नाही” अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेतले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर