Breaking News
मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांचे उपोषण स्थगित, उपचार सुरू
जालना -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषणही आज स्थगित झाले. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत काल रात्री मराठा आंदोलकांनी आक्रोश केला होता. त्यांनतर जरांगे यांना समाजाच्या वेदना सहन न झाल्याने त्यांनी आज उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत उपोषण स्थगित केलं. यावेळी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाले होते.
दुसरीकडे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषणही स्थगित झालं आहे. यावेळी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. सात दिवसांचे आमरण उपोषण केल्यानंतर उपचारासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जालन्याकडे रवाना झाले. जालन्याच्या विरा मेडीसीटी रुग्णालयात हाके आणि वाघमारे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रवाना झाले. पुढील काही दिवस हाके आणि वाघमारे जालन्याच्या वीरा मेडीसीटी रुग्णालयात उपचार घेणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर