Breaking News
बडोदा-मुंबई महामार्गावरील बोगदा विना अपघात १५ महिन्यात पूर्ण
बिझनेस
पनवेल - बडोदा – मुंबई या महामार्गाच्या बांधकामाच्या शेवटच्या पॅकेजचे बदलापूर येथील भोज गाव ते पनवेल येथील मोरबे गाव येथील ९.९८ किलोमीटर लांबीचे बांधकाम वेगाने सुरू असून या महामार्गावर ४.१६ किलोमीटर लांबीचे दोन दुहेरी बोगदे खणले जात आहेत.
यातील एक बोगदा खणण्याचे काम अवघ्या १५ महिन्यांत पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमांवर दिली.
ज्या कामाला २४ महिने लागतात तेच काम ९ महिने आधीच पूर्ण झाले आहे. यासाठी ३०० कामगार, २० अभियंते दिवसरात्र एक करून करत झटत आहेत. भोज ते मोरबे या शेवटच्या पॅकेजचे १४०० कोटी रुपयांचे काम इरकॉन इंटरनॅशनल आणि जे. कुमार इन्फ्रा. प्रोजेक्ट या कंपन्या करत आहेत. शेवटच्या पॅकेजचे बोगद्यासह महामार्ग बांधण्याचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे.
दुहेरी बोगद्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण खणून झाले असून उर्वरित दुसऱ्या बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या दोन्ही बोगद्यांची मध्यभागाची उंची १३ मीटर आणि रुंदी २२ मीटर आहे.
या बोगद्यामुळे पनवेल ते बदलापूर यामधील अंतर १५ मिनिटांत गाठता येणार आहे.
मुंबई- बडोदा राष्ट्रीय महामार्गामुळे १५ मिनिटांत पनवेलकरांना बदलापूरला जाता येईल. तसेच जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहतूक यापुढे बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली – बडोदा महामार्गाने करता येणार असल्याने पनवेल, तळोजा, कल्याण येथील वाहतुकीचा निम्मा ताण कमी होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई – बडोदा महामार्गाचे आरेखन केले आहे. हा बोगदा खणताना सर्व सुरक्षेचे नियम पाळल्यामुळे एकही दुर्घटना घडली नाही ही बाब लक्षवेधक आहे. दोन्ही बोगदे एकमेकांना लागूनच आहेत. त्यामुळे एका बोगद्यात काही अडथळा झाल्यास वाहतूक दुसऱ्या बोगद्यात वळविता येईल अशी रचना करण्यात आली आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंकडील बिंदू जुळण्यासाठी सर्वेक्षण पथकाने जुळवून आणलेल्या कॉर्डिनेट्समुळे बोगद्याचा मध्य अचूक गाठता आला. अशी माहिती पी. डी. चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
ग्रीन फील्ड बोगद्यात मध्ये वाहने प्रवेश करु शकणार नाहीत या पद्धतीने
बोगद्यांची रचना करण्यात आली आहे. हे बोगदे खणण्यासाठी माथेरानच्या डोंगररांगामध्ये डोगराला दिवसाला चार वेळा सुरुंग स्फोट घडवून आणले जात होते. स्फोटानंतर डोंगराला भेदून त्यातील ३ ते ४ मीटर लांबीतून निघणारा राडारोडा काढून त्यानंतर बोगद्याचे पुढील कामाची सुरुवात केली जात होती. हा बोगदा खणण्यासाठी स्वित्झर्लंड येथील बनावटीच्या यंत्रसाहित्याची जोडणी करून ह्यबूमर ड्रील जम्बो यंत्राच्या साह्याने दोन्ही बोगदे खणण्याचे काम सुरू आहे. यंत्रासोबत चालक, ऑपरेटर, मजूर, मशीन साहाय्यक असे ३०० मजूर याच ठिकाणी दिवसरात्र दोन पाळ्यांमध्ये काम करतात. अजूनही दुसऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
इरकॉन कंपनीच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व सुरक्षेचे नियम पाळून हे काम ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर कामगार तसेच यंत्रणा करू शकलो याचे समाधान वाटते.
स्फोटापूर्वी काम करताना परिसरात वन्यजीव दिसण्याच्या घटना घडल्या होत्या मात्र स्फोटाच्या आवाजानंतर वन्यजीव आढळले नाही. जेथे काम सुरू आहे त्यापासून काही अंतरावर मजुरांची राहणे आणि जेवणाची सोय कंपनीने केल्याने मजुरांचा वाहतूक खर्च तसेच वेळेची बचत झाली. अनेक अभियंत्यांनी याच परिसरात वास्तव्य करण्याची तयारी दर्शविल्याने १५ महिन्यांत एक बोगदा यशस्वीपणे खोदता आल्याचे समाधान वाटत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर