Breaking News
कॅनडामध्ये हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी
ब्रॅम्प्टन -गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानी आंदोलकांवरून भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध तणावपूर्ण झाले आहेत. भारतीय लोकांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भारत विरोध दर्शवत खलिस्तानी आंदोलक झेंडे फडकावत असतात. यामुळे तेथील हिंदू धर्मिय आणि शीख यांच्यामध्ये संबंध देखील ताणले जातात. अशाच एका प्रकरणात कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. खलिस्तानी झेंडे घेऊन आलेले आंदोलक आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये झालेल्या संघर्षात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. हिंदू सभा मंदिरात कॉन्सुलर कार्यक्रमाच्यादरम्यान मंदिराच्या बाहेर आंदोलकांनी खलिस्तानी झेंडे फडकवले होते. यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी ब्रॅम्प्टनमध्ये घडली होती.
३ नोव्हेंबर रोजी ब्रॅम्प्टनमधील मंदिराबाहेर निदर्शकांनी खलिस्तानी झेंडे फडकावले आणि त्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. या गोंधळांचं रूपांतर हिंसाचारात झालं होतं. यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये मंदिराच्या परिसरात मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. या घटनेनंतर ब्रॅम्प्टन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी पुजाऱ्याच्या विधानाचा निषेध केला.
तसेच ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी म्हटलं की, कोणत्याही धर्मगुरूंनी हिंसक वक्तृत्व किंवा समुदायामध्ये हिंसा आणि द्वेष वाढेल असे विधान करू नये. या ठिकाणी बहुसंख्य शीख कॅनेडियन आणि हिंदू कॅनेडियन सामंजस्याने राहतात. ते कसल्याही प्रकारचा हिंसाचार सहन करत नाहीत. दरम्यान, यानंतर हिंदू सभा मंदिराचे अध्यक्ष मधुसूदन लामा यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी पुजाऱ्याचे निलंबन केलं आहे. यासंदर्भात हिंदू सभा मंदिराकडून बुधवारी एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर