Breaking News
कल्याण पुन्हा हादरलं, धावत्या एक्स्प्रेस गाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तपासात धक्कादायक बाब उघड
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर धावत्या एक्स्प्रेसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरी ते अकोला दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध सध्या सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वमध्ये राहणारी एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी २९ जून रोजी कल्याण स्टेशन परिसरात फिरण्यासाठी आली होती. तिची मानसिक स्थिती ठीक नाही. ती कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात होती. त्यावेळी एका तरुणाने तिला हेरले. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. तिच्यासोबत चालत गप्पा मारत तो तिला कल्याण पूर्वेकडे घेऊन आला. गप्पांच्या ओघात त्याने तिला आपल्या भावाच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या भावाने तिला घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे तो तिला परत कल्याण रेल्वे स्थानकात घेऊन आला.
यानंतर कल्याण स्थानकातून त्याने अकोल्याकडे जाणारी एक्सप्रेस पकडली. या प्रवासात इगतपुरी ते अकोला दरम्यान या नराधमाने धावत्या रेल्वेत या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर तो तिला अकोला येथील त्याच्या घरी घेऊन गेला. मात्र, त्याच्या घरच्यांनी मुलीला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला पुन्हा अकोला रेल्वे स्थानकात आणून सोडले. त्यानंतर तो तिथून पसार झाला.
यानंतर अकोला रेल्वे स्थानकात ही पीडित मुलगी पोलिसांच्या निदर्शनास पडली. त्यांनी तिची चौकशी केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. या घटनेचे गांभीर्य ओळखून अकोला रेल्वे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पुढील तपासासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पीडित मुलीलाही कल्याण रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे. या घटनेदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, दोन वर्षांपूर्वी याच अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade