Breaking News
हिंजवडी ‘आयटी पार्क’ वर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मोठी कारवाई
पुणे - देशभर प्रसिद्ध असेल्या पुण्यातील हिंजवडी IT Park वर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्ककडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी मुळा नदीत थेट सोडले जात असल्याचा ठपका ठेवणारी नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. आता याप्रकरणी IT Park सह हा प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीला ३५ लाख रुपयांची बँक हमी जमा करण्याचे निर्देश मंडळाने दिले आहेत.
प्रदूषित पाण्यामुळे मुळा नदीतील माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. IT पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला तपासणी केली. या तपासणीत प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ४ मेगालिटर असताना प्रत्यक्षात हा तिथे प्रतिदिन १.५ मेगालिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे आढळून आले.
प्रदूषण महामंडळाने हिंजवडी आयटी पार्कची जबाबदारी असलेले एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आणि प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीला नोटीस बजावली आहे. यात समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी ७ दिवसांत सुधारणा करण्याची मुदत दिली आहे. याचबरोबर एमआयडीसी अथवा प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीने ३५ लाख रुपयांची बँक हमी मंडळाकडे जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर