Breaking News
राज्यात ८५ वर्षांवरील मतदार १२ लाखांहून अधिक
मुंबई - राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १२ लाखांहून अधिक आहे.
या वयोगटात एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ५ लाख ४२ हजार ८९१ पुरुष मतदार तर ६ लाख ९८ हजार २२ महिला मतदार आणि ६ तृतीयपंथी मतदार आहेत.
पुणे जिल्ह्यात ८५ वर्षांवरील वयोगटात सर्वाधिक १ लाख २१ हजार ७६० मतदार आहेत. ज्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ५९ हजार २९७ तर महिला ६२ हजार ४६० आणि ३ तृतीयपंथी मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील ९२ हजार ८७५ मतदारांमध्ये ४८ हजार २९२ पुरुष तर ४४ हजार ५८३ महिला मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या ६० हजार २७८ इतकी असून यामध्ये २५ हजार ४२९ पुरुष आणि ३४ हजार ८४९ महिला मतदार आहेत. ८५ वर्षांवरील सर्वात कमी मतदार गडचिरोली जिल्ह्यात असून येथील एकूण ६ हजार ६१३ मतदारांमध्ये २ हजार ५५७ पुरुष तर ४ हजार ५६ महिला मतदार आहेत.
राज्यात ८५ वर्षांवरील तृतीयपंथी मतदारांची एकूण संख्या ६ असून यामध्ये ३ मतदार पुणे जिल्ह्यात आणि मुंबई शहर, सातारा तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade