Breaking News
तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून अंबाबाईला मानाचा शालू
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर - दरवर्षी नवरात्रोत्सवात तिरूमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची प्रथा आहे. तिरुपतीहून आलेला हा मानाचा शालू अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे या शालुचं पूजन करून, तो अंबाबाईला अर्पण केला. तब्बल तब्बल 1 लाख 28 हजार 700 रुपये किंमतीचा हा शालू देवीला अर्पण करण्यात आला. यावेळी तिरुमल्ला देवस्थान तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या नवरात्रोत्सव सुरू असून प्रत्येक नवरात्रीला तिरुमला देवस्थानकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हा शालू येत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आज तिरुमला देवस्थानचे अधिक्षक शशिधर यांच्यासह तिरुमला देवस्थानचे इतर पदाधिकारी व सदस्य अंबाबाईला शालू घेऊन कोल्हापुरात दाखल झाले. ‘गोविंदा… गोविंदा… गोविंदा…’ असा जयघोष करत रितीरिवाजाप्रमाणे 1 लाख 28 हजार 700 रुपये किंमतीचा हा शालू अंबाबाईला अर्पण करण्यात आला.
शालूसोबत तिरुमला तिरुपती देवस्थानचे लाडू, फळे आणि फुलांचा हार देखील देवीला देण्यात आला. पारंपरिक पद्धतीनं शालू आणणाऱ्या मानकऱ्यांचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आलं. तसंच अंबाबाई देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी तसंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दरवर्षी नवरात्रीत तिरूमला तिरुपती देवस्थान कडून श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) ला साडी अर्पण करण्याची अनेक वर्षांपासून प्रथा आहे.
नवरात्र उत्सव सुरू असल्यानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कोल्हापूरसह राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापुरात दाखल झाले असून अंबाबाईचं मुख्य दर्शन रांग छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गेली आहे. भाविकांना तब्बल दोन ते तीन तास दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागत असून गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, भाविकांची गर्दी आणि चेंगराचेंगरीची शक्यता असल्यानं पितळी उंबराच्या आतून दर्शन बंद करण्यात आलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade