Breaking News
मागास प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
मुंबई - राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र गुणवंत 75 विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिवष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जारी केला आहे. ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला होता. यानंतर तातडीने बैठक घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.शिष्यवृत्तीचा लाभ मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा देशसेवेसाठी करुन देणे आवश्यक राहणार आहे, तशा आशयाचे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे.
परदेशात उच्च शिक्षणाकरीता शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी अभ्यासक्रम विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यास मुदतवाढ व वाढीव खर्च दिला जाणार नाही.
राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना 2019-20 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची संख्या 75 इतकी करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade