Breaking News
‘एक देश एक निवडणूक’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत एक देश एक निवडणूक यावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीनं तयार केलेल्या अहवालाला मंजुरी आज देण्यात आली. लोकसभेचा कार्यकाळ २०२९ मध्ये संपणार आहे. त्यावेळी लोकसभेसोबतच सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणूक घेण्यात याव्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर १०० दिवसांत देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाव्यात अशी शिफारस कोविंद यांच्या समितीनं केली आहे. कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं १८ हजार पानांचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना दिला आहे.
या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली असली तरी तो प्रत्यक्षात येणे फार सोपे नाही कारण काँग्रेससह १५ पक्षांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेसने याला अव्यवहार्य आणि लोकशाहीशी विसंगत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही योजना जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली असून ही यशस्वी होणार नाही… जनता ती स्वीकारणार नाही, असे म्हटले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना खर्गे यांनी हे वक्तव्य केले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे व्यावहारिक दृष्टीकोनातून आव्हानात्मक तर आहेच, पण देशाच्या संघराज्यात्मक रचनेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे विरोधी पक्षांचे मत आहे. अशा योजनांच्या अंमलबजावणीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो आणि राज्यांच्या स्वतंत्र निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला विरोध करत विरोधकांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करून देशव्यापी पातळीवर विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant